Naxal Encounter – बिजापूरमध्ये सुरक्षा दलांचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, अनेक नक्षली नेते ठार झाल्याची शक्यता

छत्तीसगडच्या बिजापूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील नॅशनल पार्क परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत मोठे नक्षली नेते ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

चकमकीत नेमके किती नक्षलवादी मारले गेले आहेत? याचा निश्चित आकडा समोर आलेला नाही. मात्र, जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू आहे. बीजापूरच्या पोलीस अधीक्षकांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. त्या परिसरात नक्षली असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस आणि सुरक्षादलाच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली आहे.

बिजापूर आणि गडचिरोलीच्या सीमेवरील राष्ट्रीय उद्यानात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. सध्या घटनास्थळावरून काही शस्त्रे आणि नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. जे नक्षलवादी हत्यार खाली ठेवणार नाहीत त्यांचा खात्मा करण्याचे आदेश दिले आहेत.