
भविष्यातील युद्धे ही केवळ मशीन किंवा डेटाच्या आधारे लढली जाणार नाहीत, तर ती तंत्रज्ञान आणि जमीन मिळून एकत्र येऊन लढली जातील. तिथे मानवी विचार आणि तंत्रज्ञानाची ताकद एकत्र येऊन काम करेल. आता प्रत्येक मिशनमध्ये स्मार्ट वॉरफेयर असेल असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये एआयने आघाडी दिली, असेही द्विवेदी यांनी म्हटले. दिल्लीत आयोजित डिफेन्स डायलॉग 2025 मध्ये ते बोलत होते.
संरक्षणविषय परिसंवादात लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी आधुनिक युद्ध, तंत्रज्ञानाची क्रांती आणि मानवीय दृष्टिकोनाच्या नव्या संतुलनावर भाष्य केले. द्विवेदी म्हणाले, युद्ध कोणत्याही युगात लढले तरी त्याचा अंतिम निर्णय जमिनीवरच होतो. तंत्रज्ञानाचा उद्देश लष्कराला जमिनीवर फायदा करून देणे असतो, मग तो भूभागावर कब्जा असो, संरक्षण असो किंवा रणनीती नियंत्रण असो. मला असे वाटतेय की, भविष्यातील युद्धे स्मार्ट बूट्स ऑन ग्राऊंड आणि बॉट्स म्हणजे सैनिक व रोबोट यांच्यासोबत होतील. माईंड इन द क्लाऊड, आईज इन द स्काय! तंत्रज्ञान कधी कधी फेल होतात. अशा वेळी तंत्रज्ञानाशिवाय युद्ध लढण्यास सक्षम राहिले पाहिजे. जग आता 4.0 इंडस्ट्रीवरून 5.0 इंडस्ट्रीच्या दिशेने जात आहे. तिथे मशीन माणसाची जागा घेणार नाही, तर त्यांची क्षमता वाढवेल. आपण ह्युमन ऑम्प्लिफाईड बाय एआयच्या दिशेने जात आहोत. तिथे एआय लष्कराचे विचार आणि निर्णय सशक्त बनवतील. जग आता टेक्नोलॉजी जनरेशन 7 च्या दिशेने सरकत आहोत. नॅनोमीटर मायक्रोचीप, मोबाईल आणि गेमिंग पंसोल यासारखे तंत्रज्ञान मिळून नव्या शक्यता खुल्या करत आहेत, असे लष्करप्रमुख म्हणाले.




























































