IPL 2026 – पालघर एक्स्प्रेस लॉर्ड शार्दुल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात, वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाजही संघात

IPL 2026 च्या हंगामात जोरदार घमासाण पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आतापासूनच संघांनी रस्सीखेच सुरू केली आहे. अशातच मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळत लखनऊ सुपर जायंट्स संघासोबत ट्रेड डिल करत शार्दुल ठाकूरला आपल्या ताफ्यास सामील करून घेतले आहे. शार्दुल ठाकूरच्या रुपात मुंबईला एक दर्जेदार वेगवान गोलंदाज मिळाला आहे. शार्दुल गोलंदाजीसोबत गरज पडल्यास आक्रमक फलंदाजीसुद्धा करू शकतो. त्यामुळे आगामी हंगामात मुंबईला शार्दुलचा दुहेरी उपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शार्दुलसोबत वेस्ट इंडिजचा आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज शेरफेन रदरफोर्डचा सुद्धा मुंबई इंडियन्समध्ये समावेश करण्यात आला आहे.

शार्दुल ठाकुरसाठी IPL 2025 च्या हंगामाची सुरुवात खराब राहिली, कारण लिलाव प्रक्रियेत त्याला कोणत्याच संघाने खरेदी केले नाही. मात्र, लखनऊ सुपर जायंट्सचा मोहसिनला दुखापत झाली आणि शार्दुलसाठी आयपीएलच दार उघडलं. त्याने मागील हंगामात लखनऊकडून 10 सामने खेळले. शार्दुलने संपूर्ण आयपीएलमध्ये आतापर्यंत 105 सामने खेळले असून 107 विकेट घेतल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर 325 सुद्धा आहेत. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये सहा संघांच प्रतिनिधीत्व केलं आहे. आता पहिल्यांदा तो मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरणार आहे. मुंबईने 2 कोटी रुपये खर्च करत त्याला संघात घेतलं आहे.

शार्दुल ठाकुरसोबर वेस्ट इंडिजचा डावखुरा विस्फोटक फलंदाज शेरफेन रदरफोर्डला सुद्धा मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी संघात घेतलं आहे. रदरफोर्डच्या आक्रमक शैलीचा मुंबई इंडियन्सला वेगवान धावा करण्यासाठी फायदा होऊ शकतो. IPL 2025 मध्ये त्याला गुजरात टायटन्स संघाने 2.6 कोटी रुपयांना खरेदी केले होते. रदरफोर्ड आयपीएलमध्ये आतापर्यंत 23 सामने खेळला आहे.