
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची महायुती झाल्यामुळे भाजपमधील अनेक इच्छुकांनी बंडखोरीचे शस्त्र उपसले आहे. रत्नागिरी शहरातील १६ प्रभागांपैकी सहा प्रभागात भाजपचे बंडखोर उमेदवार निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
रत्नागिरी नगर परिषदेत १६ प्रभागात ३२ जागा आहेत. निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटात युतीची चर्चा सुरू आहे. रत्नागिरी शहरातील ३२ पैकी १० जागा भाजपला सोडण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. दहाच जागा वाट्याला येणार असल्याने भाजपच्या इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजपकडून प्रभाग क्र.६ मध्ये प्राजक्ता रूमडे आणि प्रभाग क्र.७ मधून नीलेश आखाडे इच्छुक होते. गेली पाच वर्ष हे दोघेही याप्रभागात कार्यरत होते. मात्र महायुतीमुळे यादोघांची उमेदवारी संकटात सापडली आहे. नीलेश आखाडे यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. शहरातील प्रभाग क्र.२,४,६,७,८ आणि १५ मध्ये भाजपाकडून बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रभाग क्र.९ मध्ये शिंदे गटाकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. या बंडखोरीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
इच्छुक मंडळी उमेदवारीच्या प्रतिक्षेतच
दि.१० नोव्हेंबरपासून नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. पहिल्या चार दिवसात फक्त दोनच उमेदवारांचे अर्ज रत्नागिरी नगर परिषदेकडे दाखल झाले आहेत. प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत. आज चौथ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. नगराध्यक्षपदासाठीही अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. सर्वच इच्छुक उमेदवार अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.




























































