
तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. काल सायंकाळी खारेकर्जुने येथे घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या रियांका पवार या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेले. तब्बल 12 तासांच्या तपासानंतर आज सकाळी तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शाळा आणि गाव बंद ठेवून निष्क्रिय प्रशासनाचा निषेध नोंदवला.
खारेकर्जुने येथे शेतात वस्ती करून राहणाऱ्या कुटुंबातील काही सदस्य काल सायंकाळी शेकोटी करून काम करत होते. यावेळी घराजवळ खेळणाऱ्या रियांका पवार हिला शेजारील तुरीच्या शेतातून अचानक आलेल्या बिबट्याने उचलून नेले. कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला. मात्र, हाती काहीही लागले नाही. गावकऱयांच्या मदतीने वन अधिकाऱयांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली, पण रियांका सापडली नाही. अखेर आज सकाळी रियांकाचा मृतदेह हिंगणगाव रस्त्यावर शाळेपाठीमागे आढळून आला. या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




























































