
चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारांना लुटणाऱ्या तिघांच्या टोळीला घाटकोपर पोलिसांनी जेरबंद केले. आरोपी रात्रीच्या वेळेस टेम्पोतून फिरून दुचाकीस्वारांना लक्ष्य करायचे आणि त्यांना लुटून पसार व्हायचे.
हुसेन (35), मुन्ना (29) आणि दिलशादुद्दीन (20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. घाटकोपर पश्चिमेकडील होमगार्ड प्रशिक्षण केंद्राजवळ सूरज हा त्यांच्या मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना अचानक त्यांच्या पुढे तीनचाकी टेम्पो येऊन थांबला. टेम्पोमधून एक जण खाली उतरला आणि तो मोबाईलची मागणी करू लागला. मोबाईल फोन देण्यास नकार दिल्यावर हुसेनने चाकूचा धाक दाखवत धमकावले आणि दोघांकडून मोबाईल फोन तसेच होंडा डिओ स्कूटर हिसकावून घेतली. या प्रकरणी सूरजने तक्रार दिल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक बाबी आणि खबरींच्या आधारे 12 नोव्हेंबर रोजी आरोपींना अटक केली. आरोपींकडून चोरलेला मोबाईल आणि दुचाकी हस्तगत करण्यात आली. आरोपींनी याआधीदेखील अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. घाटकोपर पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.




























































