कर्करुग्णाच्या मदतीसाठी शिव आरोग्य सेना धावली, दाधिकाऱ्यांनी पदरमोड करत सहा महिन्यांची औषधे दिली

आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या नांदेड जिह्यातील एका कर्करुग्णाला शिवसेनेच्या शिव आरोग्य सेनेचे मदतीचा हात दिला आहे. औषधोपचारांचा महागडा खर्च या रुग्णाला परवडणारा नसल्यामुळे शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱयांनी स्वतःची पदरमोड करत या रुग्णाला सहा महिन्यांची औषधे मोफत दिली. त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

नांदेड जिह्यातील बिलोली लोहगाव येथील विठ्ठल उमरे हे कर्करोगग्रस्त असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तीन वर्षे औषधे घ्यायची आहेत. आधीच घरची परिस्थिती हलाखीची त्यात औषधांचा एवढा मोठा खर्च त्यांना परवडणारा नाही. शिवसेना राज्य संघटक उद्धव कदम यांनी ही बाब शिव आरोग्य सेनेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱयांनी स्वतःची पदरमोड करत 30 हजार रुपये जमवत उमरे यांना सहा महिन्यांची औषधे मोफत दिली. शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत यांच्या हस्ते तसेच शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना भवन येथे विठ्ठल उमरे यांची पत्नी कमल उमरे आणि मुलगी मोनिका उमरे यांच्याकडे औषधे सुपूर्द करण्यात आली.

शिव आरोग्य सेनेचे राज्य सरचिटणीस जितेंद्र सकपाळ, शिवसेना लोहा पंधार विधानसभा संपर्कप्रमुख आशीष आजगावकर, शिव आरोग्य सेनेच्या मुंबई सचिव ज्योती भोसले, मुंबई सहसमन्वयक प्रकाश वाणी, ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ. प्रशांत भुईंबर, ठाणे जिल्हा समन्वयक एकनाथ अहिरे, मोहन वायदंडे, अनंत जयस्वाल, नंदकुमार बागवे, वैभव कुद्रे, नागेश गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.