
दत्ताराम गायकवाड फाऊंडेशन पुरस्कृत व ओम साईश्वर सेवा मंडळ आयोजित मुंबई पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुष गटात दादरचा श्री समर्थ व्यायाम मंदिर, तर महिला गटात माहीमची सरस्वती कन्या संघ विजेता ठरला.
लालबागच्या मनोरंजन मैदानावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात श्री समर्थने विद्यार्थी क्रीडा केंद्रावर 16-10 अशी सहज मात करून दहा वर्षांची प्रतीक्षा संपवली. सामन्यात पीयूष घोलम (2 मिनिटे संरक्षण, 5 गडी), वेदांत देसाई (2.10 व 2.20 संरक्षण, 3 गडी) आणि विशाल खाके (1.50 संरक्षण, 3 गडी) यांनी दमदार खेळ केला. विद्यार्थीच्या ओमकार मिरगळने 4 गडी तर हर्ष कामतेकरने भक्कम संरक्षण करीत चुरस कायम ठेवली.
महिलांच्या अंतिम लढतीत सरस्वती कन्या संघाने ओम साईश्वर मंडळावर 7-4 असे विजय मिळवत सलग तिसरा किताब पटकावला. जान्हवी लोंढेने दोन्ही डावांत नाबाद राहत अष्टपैलू खेळ केला, तर सेजल यादवची भक्कम बचावात्मक खेळी विशेष ठरली. ओम साईश्वरकडून कादंबरी तेरवणकर आणि काजल मोरे यांनी चांगली झुंज दिली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मुंबई खो-खो संघटनेचे अध्यक्ष ऍड. अरुण देशमुख, सचिव सुरेंद्र विश्वकर्मा आणि आयोजक श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला.
स्पर्धेतील विशेष खेळाडू पुरस्कार
अष्टपैलू ः पियूष घोलम (श्री समर्थ), जान्हवी लोंढे (सरस्वती); उत्कृष्ट संरक्षक ः हर्ष कामतेकर (विद्यार्थी), सेजल यादव (सरस्वती); उत्कृष्ट आक्रमक ः वेदांत देसाई (श्री समर्थ), कादंबरी तेरवणकर (ओम साईश्वर).
























































