
>> दिव्या सौदागर
स्त्रियांच्या नैराश्याचे कारण अनेकदा त्यांच्या भूतकाळात लपलेले असते. गतकाळातील आठवणी, प्रसंग यांची तुलना करत आलेल्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन योग्य ठरते.
सविताताई (नाव बदलले आहे) या एक महिन्यापासून स्वत:च्या नकारात्मकतेवर काम करत होत्या. त्यांना त्यांच्या आयुष्यात जवळ जवळ तीन वेळा नैराश्य आले होते. पहिल्या दोन्ही वेळेला जेव्हा त्यांना नैराश्य आलं होतं तेव्हा त्यांनी मानसोपचार घेऊन त्याला थोपवलं होतं. आता मात्र जेव्हा त्यांना तिसऱ्यांदा नैराश्याने ग्रासले तेव्हा त्यांनी मानसोपचारांबरोबरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार समुपदेशनही सुरू केले. “मला आता या मानसिक दुखण्यातून बरं व्हायचंच आहे. त्यामुळे तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी वागेन आणि विचारांमध्ये बदल करेन.’’ सविताताई सत्राला आल्यावर स्वतविषयी बोलताना हे सगळं स्पष्ट सांगत होत्या. “माझा नवरा या सगळ्या बाबतीत बराच सजग आहे. त्याने मला सर्व प्रकारचं सुख माझ्या पायाशी आणून ठेवलं आहे. जेव्हा त्याला माझ्या बाबतीतला त्रास जाणवला तेव्हा तोच मला सायपाट्रिस्टकडे घेऊन गेला होता आणि त्या वेळी त्याने मला भरपूर जपलं. आताही जेव्हा मला नैराश्य आलंय तेव्हा त्यानेच मला पुन्हा सायपाट्रिस्टकडे पाठवलं.’’ आपल्या नवऱ्याबद्दल त्यांना वाटत असलेली कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतीच.
“खरोखर कौतुकास्पद आहे त्यांचं वागणं!’’ असं वाखाणताच सविताताई अजूनच खुलल्या. “खरंय, असा नवरा मिळायला भाग्य लागतं!’’ हे सांगतानाच त्यांच्या डोळ्यांच्या कडा किंचित ओलसर झाल्या. सविताताईंच्या या अशा त्यांच्या यजमानांच्या प्रति भावुक होण्याला त्यांची सामाजिक पार्श्वभूमीही कारणीभूत होती. त्या अशा कुटुंबात वाढलेल्या होत्या, ज्यात मुलींना दुय्यम स्थान होते. मुलगा हवा या अट्टहासामुळे त्यांना पाच बहिणी झाल्या आणि त्यातील दोन जणींना त्यांच्या पालकांनी जन्माला येऊच दिले नव्हते.
घरात त्यांना आणि त्यांच्या बहिणींना मिळणारी दुय्यम वागणूक, हेटाळणी आणि त्यात भरीला शीघ्रकोपी वडील यामुळे सविताताईंची मानसिक घुसमट लहानापासून सुरू झाली. त्याच वेळी सविताताईंना नैराश्य सुरू झाले. त्या दिवसभर रडायच्या किंवा झोपून राहायच्या. घरात त्यांची पुन्हा हेटाळणी सुरू झाली, पण त्या वेळी त्यांना स्वतला समजत नव्हतं की, त्यांना काय होतं. त्याच सुमारास त्यांचं लग्न लावून दिलं गेलं, पण साविताताईंची आगीतून फुफाटय़ात अशी अवस्था झाली. सासरचे लोक तशाच प्रकारचे भेटले होते. नवरा दिवसभर नोकरीच्या निमित्ताने बाहेर, त्यामुळे आलेलं एकटेपण, त्यात लग्नानंतर लगेचच त्यांना दिवस गेले. बाळंतपणासाठी त्यांना माहेरी जाऊ दिले नव्हते. या सगळ्याचा पुन्हा त्यांना मनस्ताप झाला आणि दुसऱ्यांदा त्यांना नैराश्य जाणवायला लागले.
“पण आता का मला नैराश्य आलं आहे? काही समजत नाही मला. एकतर आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आता आमच्या लग्नाला वीसेक वर्षेही झाली. माझा नवरा आणि मुलगाही समजून घेणारे आहेत. माझ्या नैराश्याला जाणतात. सपोर्ट करतात.’’ सविताताई त्यांच्या पुन्हा आलेल्या नैराश्याचे विश्लेषण करत होत्या, पण त्यांना सांगता काही येत नव्हते. मात्र त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट सतत जाणवत होती ती म्हणजे त्यांच्या यजमानांची स्तुती. त्या खूप वेळा त्यांच्याबद्दल बोलत असायच्या, पण नेहमी एकटय़ाच सत्रांना येत होत्या. त्या वेळी त्यांना त्याबद्दल विचारले असता त्या म्हणून गेल्या, “तो सतत बिझी. माझ्यासाठी त्याला वेळ कुठे? माझ्या अकाऊंटला एक रक्कम महिन्याला टाकली की, तो मोकळा होतो. मला त्याने सगळी सूट दिली आहे. शॉपिंग, किटी पार्टीज, पिकनिक्स मी सगळं करू शकते असं त्याचं म्हणणं, पण माझ्याशी बोलायला किंवा माझ्याबरोबर बोलायला त्याला वेळ नसतो. सतत बिझनेस बिझनेस.
त्यांना नैराश्य का आलं हेही आता उघड झालं होतं. घरातील सदस्यांचा एकमेकांशी असलेला संवाद हा नव्हताच. साविताताईंची बोलण्याची, व्यक्त होण्याची, मिसळण्याची गरज भागत नव्हती. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा नैराश्याने गाठले.
एक चांगली बाब ही होती की, त्यांना या अवस्थेतून बाहेर पडायचे होते आणि मुख्यत्वे स्वतच्या अवलंबित्वावर मात करायची होती. समुपदेशनाच्या माध्यमातून तो मार्ग त्यांना सापडत होता. सगळ्यात आधी सविताताईंच्या विचारांवर आणि सवयींवर काम सुरू झाले. कारण बऱ्याचदा त्या एकटेपणातून निराश, चिंताग्रस्त आणि तणावात यायच्या. एकटेपण हे त्यांनी ओढवूनही घेतले होते. त्यांचे एकटेपण हे रिकामेपणातून आलेले होते हेही त्यांच्या सत्रांतून जाणवलं. सततचे नकारात्मक विचार त्यांना शिथिल करत होते. सारखं बसून असल्यामुळे अंगात आळस आला आणि खाणंपिणं व झोप अनियमित झाली. त्यामुळे सविताताईंना प्रत्येक दिवस आखून देण्यात आला जिथे व्यायाम/योगाभ्यास, छंद जोपासणे, घरातील काही वेगळ्या कामांकरता वेळ देणे इत्यादी पर्याय सुचवण्यात आले..
त्याचबरोबर त्यांना पुढाकार घेऊन त्यांच्या यजमानांबरोबर संवाद साधण्यास आणि सविताताईंना काय सलते हे त्यांच्याशी मोकळेपणाने बोलण्यासाठीही काही पद्धती सांगितल्या गेल्या. त्याचा परिणाम अर्थातच सकारात्मक झाला. हीच पद्धत त्यांना मैत्रिणीच्या बाबतीतही अंगीकारायला सांगितली गेली. त्यामुळे सविताताई अधिकाधिक उत्साही होऊ लागल्या.
“मी माझ्या नवऱ्याला स्पष्ट आणि शांतपणे माझ्या मनातला सल बोलून दाखवला. तोही काही क्षण भावुक झाला. त्या दिवसापासून आम्ही दोघे एकत्र मॉर्निंग वॉक घेतो. मला आता सेक्युअर वाटायला लागलंय. हरवलेलं गवसतंय अशी माझी अवस्था आहे. खूप छान वाटतंय.’’ सविताताईंच्या या बोलण्यातून आशा, आनंद आणि सुरक्षिततेची भावना डोकावत होती. नैराश्यावरची मात्रा त्यांना लागू पडत होती.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)



























































