
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सोमवारी महानिर्वाण दिन असल्याने शिवतीर्थावरील शक्तिस्थळावर हजारो शिवसैनिक, शिवप्रेमी त्यांच्या तसबिरीसमोर नतमस्तक होणार आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना वंदन करणार आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर अक्षरशः शिवतेजच निर्माण होणार आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मनात आत्मसन्मानाचे स्फुल्लिंग चेतवले. मराठी माणसाला सन्मानाने, स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगण्याचा मंत्र दिला. लाखो लोकांमध्ये अन्यायाविरोधात लढण्याची ऊर्मी निर्माण केली. अशा या उत्तुंग नेत्याचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी महानिर्वाण झाले. त्यामुळे अवघा देश हळहळला. मराठी माणूस पोरका झाला. त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांच्या महानिर्वाण दिनानिमित्त शिवतीर्थावरील शक्तिस्थळावर मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱयातून जथेच्या जथे दाखल होत असतात. याच पार्श्वभूमीवर सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी शक्तिस्थळावर निष्ठेचे दर्शन घडणार आहे.
कणखर नेता, सिद्धहस्त व्यंगचित्रकार
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक कणखर नेता आणि सिद्धहस्त व्यंगचित्रकार होते. प्रभावशाली वक्तृत्व, दिलदार माणूस, सापेक्षी संपादक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश त्यांनी दिला. त्यामुळेच बाळासाहेब लहानथोरांचे आवडते नेते होते. त्यामुळे त्यांच्या महानिर्वाण दिनी त्यांना वंदन करण्यासाठी शक्तिस्थळावर हजारो शिवप्रेमींची गर्दी होत असते.
पालिकेची व्यवस्था, पोलिसांचा तगडा बंदोबस्त
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त शक्तिस्थळावर आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट, हिरवळ साकारण्यात आली आहे. तेजस्वी जोत या ठिकाणी अखंड तेवतच आहे. शिवाय पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात स्वच्छतेची व्यवस्था, पिण्याचे पाणी अशा सुविधा देण्यात येणार आहेत. तर पोलिसांकडूनही शिवतीर्थावर चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.




























































