
गुन्हेगारांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी पोलीस दलाकडून आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार शहरासह जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक संदीप घुगे रस्त्यावर उतरणार आहेत. जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबविले जाणार आहे.
सांगली जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने जोरदार मोहीम उघडण्याची तयारी सुरू केली आहे. फाळकुटदादासह सराईत गुन्हेगारांचा जिल्ह्यातील गुन्हेगारीत मोठा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. गत वर्षीच्या तुलनेत गुन्हेगारीचा आलेख कमी असला, तरी सुरक्षित सांगलीसाठी पोलीस दलाकडून ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. पोलिस अधीक्षक घुगे यांनी त्याचा ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. शहरातील प्रत्येक चौकांसह गल्लीबोळात पोलिसांची फौज उतरणार आहे. नशेखोरांसह फाळकुटदादांना आता पोलिसांचा खाक्या दाखवला जाणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून, रविवारपासून ही मोहीम राबविली जाणार आहे.
अधीक्षक पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे मिरज येथे, तर अपर अधीक्षक कल्पना बारावकर या सांगलीत नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी असणार आहे. नशेखोरीचे अड्डय़ांसह हुल्लडबाजी, दादागिरी करणाऱ्यांना आता दंडुका दाखविला जाणार आहे. सांगलीकर नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी हा प्लॅन बनविला आहे.
शहरात गेल्या आठवडय़ात झालेल्या खुनाच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक भागात कोम्बिंग ऑपरेशन राबविले जाणार असून, तशा सूचना प्रत्येक पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल आता अलर्ट मोडवर आले आहेत. तसेच संवेदनशील ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्ती आणखी प्रभावी केली जाणार आहे. पोलीस अधीक्षकांचा हा नवा ऍक्शन प्लॅन उद्यापासून राबविला जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
सीसीटीव्ही व्हॅनची मदत
सांगली शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस दलातील सीसीटीव्ही व्हॅनची गस्त आता वाढविली जाणार आहे. त्याची करडी नजर ठेवली जाणार आहे. त्यात काही अक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्यास तातडीने कारवाई केली जाणार आहे.



























































