माउलींच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली, कार्तिकी यात्रेनिमित्त इंद्रायणी काठ वारकऱ्यांच्या गर्दीने फुलला

छायाचित्र - दत्तात्रय आढाळगे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात कार्तिकी यात्रेअंतर्गत उत्पत्ती एकादशीसाठी सुमारे तीन लाखांहून अधिक वारकऱ्यांनी केलेल्या माउलींच्या गजराने शनिवारी अलंकापुरी दुमदुमली. वारकऱ्यांच्या गर्दीने इंद्रायणी काठ फुलून गेला होता. यावर्षी माउलींच्या पहाट पूजेचा मान दर्शनबारीतील ठाणे येथील वारकरी दाम्पत्यास मिळाला. आळंदी देवस्थानने या दाम्पत्याचा सत्कार केला.

ग्रामदिंडी प्रदक्षिणा, इंद्रायणी स्नान, टाळ, मृदंग, विणीचा त्रिनाद झाला. आळंदी मंदिरात पहाटे मंगलमय वातावरणात पूजा झाली. माउली मंदिर, इंद्रायणी घाट येथे लक्षवेधी विद्युत रोषणाई, तसेच मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या गजरात प्रदक्षिणा मार्गावर वारकरी भक्तिरसात चिंब झाले होते. माउलींच्या जयघोषात राज्यातून आलेल्या दिंड्यांची नगरप्रदक्षिणा झाली. इंद्रायणी घाटावर स्नानास वारकऱ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, खांद्यावर पताका, डोईवर तुळशी वृंदावन, मृदंग वादनात इंद्रायणी घाटावर वारकऱ्यांनी सांप्रदायिक खेळाचा आनंद लुटला. टाळ-मृदंगाच्या नादाने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली. माउलींच्या गाभाऱ्यात पंचामृत अभिषेक झाला. आरती झाल्यानंतर परंपरेने मानकरी आणि पदाधिकारी यांना देवस्थानतर्फे प्रसाद वाटप झाले.

श्रींचे पहाट पूजेस खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, अॅड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, पुरुषोत्तम महाराज पाटील, नीलेश महाराज कबीरबुवा लोंढे, रोहिणी पवार, खेडचे प्रांताधिकारी अनिल दौडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, सेवक चोपदार बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, अनिल कुऱ्हाडे, योगेश आरू, मंगेश आरू, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमाजी नरके, डी. डी. भोसले पाटील, दत्तात्रय लांघी, माधव खांडेकर, भीमा घुंडरे, मच्छिंद्र शेंडे आदी उपस्थित होते.

लाखो वारकऱ्यांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले. पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी दर्शन घेऊन कार्तिकी यात्रेचा आढावा घेतला. यावेळी आळंदी देवस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. मारुती देवस्थानचे अध्यक्ष अप्पा महाराज पवार आणि विश्वस्त मंडळाने दर्शन व्यवस्थेचे नियोजन केले.