
फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत हिंदुस्थानचा प्रवास आता फक्त दुसऱ्या क्रमांकाच्या ग्रॅण्डमास्टर अर्जुन एरिगॅसीवर अवलंबून राहिला आहे. अनुभवी ग्रॅण्डमास्टर पेंटाला हरिकृष्णाला पाचव्या फेरीतील टायब्रेकमध्ये पेरूचा ग्रॅण्डमास्टर जोसे एडुआर्डो मार्टिनेज अल्कान्ताराकडून पराभव स्वीकारावा लागला आणि त्याचा प्रवास येथेच थांबला. अर्जुनने दोन वेळचा विजेता ग्रॅण्डमास्टर लेव्हॉन अरोनियनला दोन डावांत 1.5-0.5 ने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत दमदार प्रवेश केला होता. दुसरीकडे, हरिकृष्णाचे मार्टिनेजविरुद्धचे पहिले दोन सामने अनिर्णित राहिल्याने टायब्रेकमध्ये त्याला कठीण आव्हानाला सामोरे जावे लागले.
पहिल्या दोन रॅपिड सामन्यांत दोघांनी बरोबरी साधली. त्यानंतरच्या 10 मिनिटांच्या रॅपिड सामन्यात हरिकृष्णाने पांढऱ्या मोहऱ्यांनी आक्रमक सुरुवात केली आणि 14 चालींनंतर उत्कृष्ट तयारीच्या जोरावर घड्याळावर जवळपास एक मिनिटाची आघाडीही मिळवली. मात्र मार्टिनेजने अचूक बचाव करत मध्यातून खेळावर पकड मजबूत केली. राणीची अदलाबदल झाल्यानंतर स्थिती अधिक अवघड बनली आणि तब्बल 59 चालींनंतर रुक-पॉन एंडगेममध्ये मार्टिनेजने विजय मिळवत हरिकृष्णाला दबावात ढकलले. दुसऱ्या सामन्यात हरिकृष्णासमोर काळ्या मोहऱ्यांनी ‘करो या मरो’ची वेळ असतानाही तो फक्त बरोबरीच साधू शकला आणि 30 चालींनंतर त्याचा स्पर्धेतील प्रवास संपला.
इतर टायब्रेक सामन्यांत अमेरिकेचा ग्रॅण्डमास्टर सॅम शँकलंडने पहिल्याच रॅपिड सामन्यात माजी वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन ग्रॅण्डमास्टर दानिअल डुबोव्हचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ग्रॅण्डमास्टर आंद्रेई एसीपेंकोने पांढऱ्या मोहऱ्यांनी विजय मिळवल्यानंतर काळ्या मोहऱ्यांनी बरोबरी साधत पुढील फेरीत प्रवेश मिळवला. शेवटचे तिकीट जर्मनीच्या ग्रॅण्डमास्टर अलेक्झांडर डोनचेनकोने व्हिएतनामच्या ग्रॅण्डमास्टर ले क्वांग लिमचा पराभव करून पटकावले.

























































