
इडन गार्डन्सवर रविवारी जो हिंदुस्थानी संघाचा तमाशा रंगला तो पाहून दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना स्वतःवरच हसू आले असेल. हिंदुस्थानी चाहतेही बेशुद्ध पडले. जिंकायला कोण आलं होतं आणि हरायला कोण? सारे स्तब्ध आणि निशब्द झाले होते. हिंदुस्थानी संघाची आज हिंदुस्थानी खेळपट्टीवरील लाजिरवाणी कामगिरी पाहून केवळ कर्णधार शुभमन गिलची मान झुकली नाही तर अवघ्या हिंदुस्थानी चाहत्यांची मान झुकली. विजयासाठी 124 धावांचे माफक लक्ष्य असताना हिंदुस्थानी फलंदाजांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली आणि सामना गमावला. आजचा हा लाजिरवाणा पराभव मायभूमीवरचा दारुण पराभवाचा चौकार ठरला. गेल्या वर्षी न्यूझीलंडने तीन सामन्यांत झुकवले होते आणि आज दक्षिण आफ्रिकन संघासमोर हिंदुस्थानी संघाने नांगी टाकली. कसोटीत 8 विकेट घेणारा सायमन हार्मर सामनावीर ठरला.
7 बाद 93 अशा भयाण अवस्थेत असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा चेहरा पाहून वाटत होतं की हे लोक तर चहा पिण्यापूर्वीच गुडघे टेकतील. पण त्या चेहऱ्यावर कोण जाणे कोणत्या पावडरीची फवारणी केली की तीच मंडळी आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बचाव करून हिंदुस्थानला अकरा वर्षांच्या जुन्या जखमेची आठवण करून गेली. 124 धावांचा पाठलाग करताना आपला बलाढ्य संघ 93 धावांत मरणासन्न अवस्थेत गेला. हिंदुस्थानी फलंदाजांची ही दयनीय अवस्था कुणालाही पाहावत नव्हती.
124चे लक्ष्य डोंगराएवढे
हो, कागदावर ते छोटे होते. पण त्या पिचवर ते पार करणे म्हणजे रस्त्यात निघूनही दर तीन पावलांनी पायाखालची वीट सरकत असावी, असा भास हिंदुस्थानी फलंदाजांना होत होता. सायमन हार्मरने तर 2015-16च्या वाईट आठवणी मिटवून वाकड्या पिचवर सरळ चेंडू मारण्याचा धंदा जोमाने केला आणि यान्सनने दोन चेंडूंमध्ये दोन्ही हिंदुस्थानी ओपनर्सना दाखवून दिलं की बाउन्सरला रोखणे सोप्पे नाही. यशस्वी जैसवाल आणि राहुलला फलकावर एक धाव लागली असताना बाद करून कसोटीने सरड्यासारखा रंग बदलल्याचे दाखवून दिले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने काही काळ हृदयाचे ठोके शांत होतील, असा खेळ केला. पण ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंतने निराश केले. या दोघांना हार्मरने बाद करून सनसनाटी निर्माण केली. 38 धावांत 4 बाद अशा बिकट अवस्थेत असलेल्या संघाची अवस्था पाहावत नव्हती. पण तेव्हाही वाटलं की रवींद्र जाडेजा संकटमोचक बनेल.
सुंदर आणि जाडेजाने भागी करायला सुरुवात केली. भागी 26 धावांची झाली होती. प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. तेव्हाच हार्मरने जाडेजाला पायचीत करून हिंदुस्थानचा पायच मोडला. त्यानंतर हिंदुस्थानचे शेपूट फार वळवळले नाही. एकट्या अक्षर पटेलने 2 षटकार खेचत विजयाची अंधूक ज्योत पेटवली होती. पण ती ज्योत महाराजने विझवली आणि हिंदुस्थानचा डाव 93 धावांतच संपवला. 124 धावांचे लक्ष्यही डोंगराएवढे वाटू लागल्याने हिंदुस्थानी फलंदाजांना शंभरीतच दम घुसमटला. आधी यान्सन, मग हार्मर आणि शेवटी महाराजने हिंदुस्थानी फलंदाजीचा बाजार उठवला. फिरकी खेळपट्ट्यांवर राजा असलेला हिंदुस्थान मायभूमीत एकेका धावेसाठी भीक मागताना दिसला. धावांची शंभरीही गाठता आली नाही.
बवुमाची झुंजार खेळी, बॉशबरोबर रचली संस्मरणीय भागी
ज्या पिचवर चेंडू बाजूला वळायचं का उडायचं याचा स्वतःलाच अंदाज नव्हता, त्या पिचवर बवुमाने केलेले अर्धशतक म्हणजे त्याने वाळवंटात पाण्याची विहीर शोधून काढली. काल सायंकाळी बचावात बवुमा थकला होता. कालच्या 7 बाद 93वरून बवुमा-बॉशने खेळ सुरू केला. मात्र हिंदुस्थानच्या फिरकी गोलंदाजांवर ‘आमचं सुरूच आहे’ अशी मुद्रा घेत बवुमा उभा होता. कार्बिन बॉशबरोबर बवुमाने केलेली भागी निर्णायक ठरली. 44 धावांच्या या भागीने संघाला शंभरीपलीकडे नेले आणि लढण्याची इच्छा जिवंत ठेवली. दोघांचा हाच संघर्ष हिंदुस्थानी संघाला महागात पडला. हिंदुस्थानच्या साऱ्या गोलंदाजांना दोघांनी तंगवले. बवुमाने तीन तास झुंज देत केलेली 55 धावांची खेळी मॅचविनिंग ठरली. त्याचा हा संघर्ष संघाला विजय मिळवून देईल, असा कुणीच विचार केला नव्हता. पण अनिश्चिततेचा खेळ असलेल्या क्रिकेटच्या या कसोटीत हिंदुस्थानी संघाचा बेभरवशाचा खेळ पुन्हा एकदा मान झुकवून गेला.


























































