
प्रधानमंत्री आवास योजना व जनमन आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांचा दुसरा, तिसरा व चौथा हप्ता शासनाकडे लटकल्याने शहापूर तालुक्यातील तब्बल आठ हजार 658 घरकुले रखडली आहेत. हप्ता मिळण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून शासन दरबारी येरझाऱ्या घालणाऱ्या लाभार्थ्यांची अक्षरशः दमछाक झाली आहे. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून सिमेंट, विटांची उसनवारी फेडण्यासाठी रोजगाराच्या शोधात त्यांनी स्थलांतर सुरू केले आहे.
शहापूर तालुक्यातील 110 ग्रामपंचायतींमध्ये प्रधानमंत्री व जनमन आवास योजनेंतर्गत नऊ हजार 728 घरकुले एक वर्षांपूर्वी मंजूर झाली आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांसाठी चार हप्त्यांमध्ये एक लाख 20 हजार, तर जनमन आवास योजनेतील घरकुलांसाठी दोन लाख रुपये तीन हप्त्यांमध्ये आवश्यक ती प्रक्रिया पार पडल्यानंतर कामाच्या स्थितीनुसार लाभार्थ्यांना देण्यात येतात. पहिला हप्ता आठ हजार 984 लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्यानंतर जोते पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता, भिंती उभ्या केल्यानंतर तिसरा व छताचे काम पूर्ण झाल्यावर चौथा हप्ता थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतो. वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या प्रधानमंत्री व जनमन आवास योजनेतील आठ हजार 984 लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याने दुसरा, तिसरा व चौथा हप्ता रखडला आहे.
जनमन आवास योजनेतील कातकरी समाजाच्या लाभार्थ्यांनी उघड्या छताखाली हप्त्यांची वाट बघितली. मात्र हप्ता न मिळाल्यामुळे निराश झालेल्या लाभार्थ्यांनी मोलमजुरी करून पोटाची भूक भागवण्यासाठी स्थलांतर सुरू केले आहे.
घरकुलाचे काम अर्धवट सोडून लाभार्थी स्थलांतर करू लागल्याने त्यांचा हक्काचा निवारा वाऱ्यावर आला आहे. त्यांच्या घराचे काम पूर्ण होण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
संसार उघड्यावर पडले
घरकुल मंजूर झाल्यानंतर अनेकांनी आपले जुने घर पाडून तिथे नवीन बांधकाम सुरू केले. मात्र हप्ते लटकल्याने या घरकुलांची कामे बंद झाली आहे. घरकुले अर्धवट अवस्थेत उभी आहेत. परिणामी या गोरगरीबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. घरकुलांचे हप्ते तातडीने द्या, असा टाहो या लाभार्थ्यांनी फोडला आहे.





























































