
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विक्रोळी ते कांजुरमार्ग दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील रुळाला तडे गेले असून त्यामुळे दादरहून ठाणे, कल्याणच्या दिशेने धावणारी उपनगरीय रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. या मार्गावरील 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे सकाळच्या वेळी कार्यालय गाठण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.
मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास विक्रोळी ते कांजुरमार्ग रेल्वे स्थानकांदरम्यान रुळाला तडे गेल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केला.
रेल्वे रुळाला तडे गेल्याने डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने कांजुरमार्ग, घाटकोपर, विक्रोळीस रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, रेल्वे सेवा कोलमडल्याने अनेकांनी रिक्षा, टॅक्सी, बेस्ट बसचा पर्याय निवडला. मात्र सीएनजीच्या तुटवड्यामुळे ही वाहतूकही मंदावलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.































































