
>> धीरज कुलकर्णी [email protected]
मेघालयच्या खासी संस्कृतीचा अकोर हा एक अविभाज्य भाग. नव्या पिढीला ही खासी संस्कृती कळावी म्हणून नव्वदी ओलांडलेल्या स्वीटीमन रिंजा या लेखक आज्जी या आजही प्रयत्न करीत आहेत. खासी भाषेच्या प्रथम स्त्री साहित्यिक म्हणून त्या गणल्या जातात. खासी समाजाचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी दस्तऐवजीकरण करण्याचे प्रचंड मोठे कार्य त्यांनी केले आहे.
‘अकोर’ (akor) हा शब्द पहा. हा शब्द खासी भाषेतील आहे. खरे पाहता, याचा अनुवाद करणे कठीण. कारण एका वाक्यात हा अनुवाद होऊ शकत नाही. तरीही ढोबळमानाने सांगायचे झाले, तर चांगले संस्कार, वागण्याची सहृदय पद्धत, इंग्रजीत ज्याला आपण गुड मॅनर्स किंवा एटिकेट्स असं म्हणू शकतो. मेघालयच्या संस्कृतीचा अकोर हा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजेच अकोर हा खासी व्यक्तीच्या जीवनातच भिनलेला आहे. अशा खासी संस्कृतीच्या अनेकानेक गोष्टी आहेत ज्या अगदी खास त्यांच्याच आहेत.
आधुनिक काळातही त्यांचे महत्त्व नव्या पिढीला कळावे म्हणून नव्वदी ओलांडलेल्या स्वीटीमन रिंजा या लेखक आजी आजही प्रयत्न करतायत. अतिशय प्रेमभराने बोलतात. समोरच्याला आपले म्हणणे ठामपणे, पण प्रेमाने समजावून सांगण्याची त्यांची क्षमता पाहून आपण थक्क होतो. भारताच्या ईशान्येकडील सात राज्ये म्हणजे प्रेमाने आपण ज्यांना सेव्हन सिस्टर्स म्हणतो, त्यातील एक म्हणजे मेघालय. भौगोलिकदृष्टय़ा देशाच्या मुख्य भूभागापासून जरा अलग पडलेल्या या राज्यांना या युगात दळणवळणाच्या अनेक साधनांनी जोडलेले आहेच, शिवाय त्यादृष्टीने अनेक प्रयत्नही सुरू आहेत. मेघालयसारख्या राज्यांचा विचार करताना तेथील लोकपरंपरा, चालीरीती, भाषा यांचा विशेष विचार करावा लागतो.
मेघालयची लोकभाषा म्हणजे खासी. खासी जमातीचे लोक मुख्यत्वे तिथे राहतात. पूर्वी आसाम राज्यात समाविष्ट असलेल्या मेघालयची निर्मिती 1972 साली करण्यात आली. याचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे इथे मातृसत्ताक पद्धत अवलंबली जाते. घरातील सर्वात धाकटी मुलगी ही आई-वडिलांना सांभाळते. मुले आईचेच आडनाव लावतात. लग्नानंतर पुरुष हे पत्नीच्या घरी राहायला जातात. खासी लोक हे आपल्या परंपरांच्या बाबतीत अतिशय काटेकोर असतात. ब्रिटिश काळात जरी बहुसंख्य जनतेचे धर्मपरिवर्तन झाले, तरीही सर्वांनी आपल्या जुन्याच परंपरांचे पालन केले. येथील भाषा, संस्कृती, गीते इत्यादी सर्व परंपरा या मौखिक. म्हणजे पिढय़ान्पिढय़ा फक्त मौखिक परंपरेने चालत आलेल्या. त्यामुळे 1840 साली काही मिशनरी येथे अभ्यासासाठी आले, तेव्हा त्यांना आढळले की, खासी भाषेला स्वतंत्र लिपी नाहीच आणि आधुनिक युगात तर सगळे महत्त्व लिपीला. त्यातून मार्ग काढण्यासाठी रोमन/लॅटिन लिपीतील अक्षरेच या भाषेला प्रदान करण्यात आली आणि आजही खासी भाषा रोमन लिपीतच लिहिली जाते.
1934 साली शिलाँग येथे जन्मलेल्या स्वीटीमन रिंजा या खासी भाषेच्या प्रथम स्त्राी साहित्यिक म्हणून गणल्या जातात. लेखनाबरोबरच खासी समाजाचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी दस्तऐवजीकरण करण्याचे प्रचंड मोठे कार्य त्यांनी व त्यांचे पती एम. एफ. ब्लाह यांनी पार पाडले. स्वीटीमन या तत्कालीन आसाम सिव्हिल सर्व्हिसची कठीण परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्याच महिला. सरकारी सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी खऱया अर्थाने लेखनाला सुरुवात केली.
1989 साली प्रकाशित झालेले ‘सिर्वेत उजमेर’ हे त्यांचे पहिले पुस्तक. यानंतर त्यांनी दहा पुस्तके लिहिली. यापैकी ‘ना स्ला सोम्हीदुर’ या पुस्तकाचा मेघालयच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. या लेखनामुळे स्वीटीमन या जणू खासी समाजाचा एक बुलंद आवाज बनल्या. त्यांच्या लेखनात, मेघालयच्या संस्कृती, इतिहास याबरोबरच सद्य लोकजीवन, चालीरीती, तिथला अनुपम निसर्ग यांचे वर्णन वाचायला मिळते. स्वीटीमन यांची पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ती अर्थातच खासी भाषेत आणि रोमन लिपीत आहेत. त्यांचा अर्थ आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने बऱयापैकी समजू शकतो.
प्रत्येक भाषेचा एक खास लहेजा असतो, वैशिष्टय़ असते. त्यामुळे अनुवादात तो रस जसाच्या तसा उतरणे शक्यच नाही. तरी पण त्यातील भावार्थ समजून घ्यायला हे नक्की उपयुक्त आहे. स्वीटीमन या आजही सार्वजनिक जीवनात सक्रिय असून खासी समाजाच्या सांस्कृतिक वारश्याच्या जपणुकीसाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या काही मुलाखती इंटरनेटवर उपलब्ध आहेत. जिज्ञासूंनी त्या जरूर पाहाव्यात. त्यांच्या पुस्तकांचे आपल्या भाषांमध्ये अनुवाद होणे अगत्याचे आहे.
ईशान्येकडील राज्यांमध्ये दळणवळण वाढवण्यास जसे आपण प्रयत्न करत आहोत, तसेच हे भाषिक दळणवळण वाढण्यासही आपण प्रयत्न करू.



























































