
हिंदुस्थानच्या महिला दृष्टीहीन महिला संघाने अंतिम लढतीत नेपाळचा पराभव करत पहिल्या टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले. कोलंबोमध्ये झालेल्या अंतिम लढतीत हिंदुस्थानने नेपाळचा 7 विकेट्सने पराभव करत जेतेपद पटकावले. हिंदुस्थानने एकही सामना न गमावता या विजेतेपदाला गवसणी घातली.
फायनलमध्ये हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि नेपाळचा डाव 5 बाद 114 धावांमध्ये रोखला. त्यानंतर हे आव्हान अवघ्या 12 षटकांमध्ये पार करत विजेतेपद पटकावले. हिंदुस्थानच्या फुला सरेन हिने 27 चेंडूत 44 धावांची खेळी केली, तर सरिता घिमिरे हिने 38 चेंडूत 35 धावा फटकावल्या.
View this post on Instagram
महिन्याभरात दुसरा वर्ल्डकप
दरम्यान, महिन्याभरापूर्वी हिंदुस्थानच्या महिला संघाने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानात झालेल्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर वीसच दिवसात हिंदुस्थानच्या महिला दृष्टीहीन संघानेही टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचा कारनामा करत हिंदुस्थानचा तिरंगा डौलाने फडकावला.
एकही सामना गमावला नाही
या स्पर्धेत हिंदुस्थान, नेपाळसह ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि युनायटेड स्टेट्सचा संघ सहभागी झाला होता. लीग स्टेजमध्ये एकही सामना न गमावता हिंदुस्थानने सेमीफायनल गाठली. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सने दारूण पराभव हिंदुस्थानने फायनल गाठली, तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये नेपाळने पाकिस्तानचा पराभव केला होता.


























































