वडिलांची प्रकृती बिघडली, स्मृती मानधनाने लग्न पुढे ढकलले

हिंदुस्थानची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न  पुढे ढकलण्यात आले आहे.  स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना सांगलीतील एका रुग्णालयात नेण्यात आले. स्मृती- पलाश यांचा विवाह  रविवारी  त्यांच्या मूळ गावी सांगलीत होणार होता.

स्मृती मानधनाचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ श्रीनिवास मानधना आज सकाळी नाश्ता करत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. आम्ही थोडा वेळ थांबलो. आम्हाला वाटले की हे सामान्य असेल, ते बरे होतील. पण त्यांची प्रकृती अधिकच बिघडत होती. त्यामुळे आम्ही कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला. तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात नेले. सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांना अजून काही काळ रुग्णालयात राहावे लागेल. त्यामुळे स्मृतीने वडिलांच्या आजारपणात लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.’

काय म्हणाले डॉक्टर

रविवारी दुपारी एक दीड वाजता स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या डाव्या बाजूच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आला. त्यामुळे सध्या आम्ही त्यांच्या सर्व चाचण्या करत आहोत, रक्तांच्या चाचण्यांमध्ये कार्डिअक एन्जायम वाढल्यामुळे त्यांना ईसीजीवर ठेवण्यात आले आहे आणि गरज पडली तर ऑजिओप्लास्टी करावी लागण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आम्ही सर्व तयारी केली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण आपण एक दिवस रात्रभर त्यांना ठेवून उद्या कुटुंबीयांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, असे स्मृतीच्या वडिलांवर उपचार करणार्या डॉ.नमन शहा यांनी सांगितले.