
सूरतमधील 28 वर्षीय डॉक्टरने कॅफेच्या नवव्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच आता आंध्र प्रदेशात आणखी एका डॉक्टरने मृत्यूला कवटाळले आहे. अमेरिकेने व्हिसा नाकरल्याने मानसिक तणावातून एमबीबीएस डॉक्टरने राहत्या घरात जीवन संपवले. रोहिणी असे मयत डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी चिलकलगुडा पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस सखोल तपास करत आहेत.
रोहिणीने 2005 ते 2010 दरम्यान किर्गीस्तानमधून एमबीबीएस केलं होतं. तिला पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेत जायचं होतं. यासाठी तिने व्हिसासाठी अप्लाय केलं होतं. मात्र अमेरिकन दूतावासाने तिचा व्हिसा नाकारला. यामुळे रोहिणी मानसिक तणावात गेली. कुटुंबीयांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा अमेरिकेतच जाण्याचा हट्ट होता.
घरातील नोकराने शनिवारी तिच्या रुमचा दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. अखेर नोकराने कुटुंबीयांना याबाबत सांगितले. कुटुंबीयांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रोहिणी मृतावस्थेत आढळली. कुटुंबीयांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
























































