साहित्य संमेलनात कवी अशोक नायगावकर यांची भावनिक साद, मराठी भाषा वाचवा.. मी भीक मागतो !

मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला असला तरी आपण मराठीपण विसरत चाललो आहोत. मराठीत बोलायलाही आपल्याला लाज वाटते. अनुवादामध्ये आपण मागे असून पुस्तक वाचण्याचे वेडही कमी होत चालले आहे. ज्ञानोबा, तुकोबांची भाषा बघता बघता.. नष्ट होऊ नये. माय मराठी वाचवा याची मी भीक मागतो.. अशी भावनिक साद ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी तमाम मराठीप्रेमी व लेखकांना केली आहे.

सार्वजनिक वाचनालय कल्याणच्यावतीने महावीर हॉलमध्ये एक दिवसीय जिल्हा साहित्य संमेलन रविवारी पार पडले. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना अशोक नायगावकर यांनी आपल्या खास शैलीत मराठी भाषेची सद्यपरिस्थिती सांगितली. ते म्हणाले की, मराठी माणसांमधील संवाद हरवत चालला असून मराठी खाद्यपदार्थदेखील हॉटेलमध्ये मिळत नाहीत. नव्या पिढीवर मराठीचे संस्कार झाले नाहीत यास आपण सगळे जबाबदार आहोत. यावेळी नायगावकर यांनी सादर केलेल्या कवितेला उत्स्फूर्त दाद मिळाली.

ग्रंथदिंडी, गझल संध्या रंगली

मराठी भाषा विभाग, साहित्य आणि संस्कृतिक मंडळ व सार्वजनिक वाचनाल याच्या वतीने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात मान्यवर साहित्यिकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांची मुलाखत विद्या प्रभू यांनी घेतली. तर प्रथमेश पाठक, संजय शिंदे यांचा नवपिढीचे साहित्यिक हा परिसंवाद गाजला. कविवर्य अशोक बागवे, प्रशांत मोरे व मंगेश सातपुते यांनी मराठी भाषेबद्दल आपले विचार मांडले. ज्येष्ठ गझलकार अप्पा ठाकूर व ममता सकपाळ यांच्या गझल संध्या या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, डॉ. उल्हास कोल्हटकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भव्य लिटरेचर फेस्टिव्हल भरवणार

जयपूरच्या धर्तीवर कल्याण, डोंबिवलीमध्ये लिटरेचर फेस्टिव्हल भरवणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केली. स्थानिक साहित्यिक, सार्वजनिक वाचनालय, रोटरी क्लब अशा विविध संस्थांच्या मदतीने हा ‘केडीएमसी लिट फेस्ट’ होणार असल्यामुळे कल्याण व डोंबिवली या दोन्ही शहरांची साहित्यिक व सांस्कृतिक उंची वाढेल, असा विश्वासही आयुक्तांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.