संजय राऊत लवकरच मैदानात दिसतील… तेही हातात तलवार घेऊन! उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रकृतीची विचारपूस

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची भांडुप येथील मैत्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय राऊत यांना तूर्त काही दिवस विश्रांती घेण्याचा आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार ते सध्या घरीच विश्रांती घेत आहेत. आज दुपारी दोनच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या निवसस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी आमदार सुनील राऊत तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘संजय राऊत यांना मी रोज फोन करत नाही. सुनील राऊत यांच्याकडून त्यांच्या तब्येतीची माहिती घेत असतो. खूप दिवसांपासून भेटायचं होतं. आज भेट झाली. भेटून बरं वाटलं. खूप प्रेश दिसले’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. संजय राऊत पुन्हा मैदानात कधी उतरणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, यस… लवकरच… नुसतेच मैदानात उतरणार नाहीत तर तलवार घेऊन मैदानात दिसतील, असा व्श्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.