
निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही जीवाणू (बॅक्टेरिया) खूप गरजेचे असतात, परंतु सध्याच्या काळात मात्र बहुतांशी लोकांमध्ये ऑण्टिबायोटिक रेझिस्टन्स निदर्शनास येत आहे. त्यामुळे शरीरातील चांगले जीवाणू कुचकामी ठरत आहेत. द लॅन्सेट – ईक्लिनिकल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडच्या अहवालात असे म्हटले आहे की, हिंदुस्थान हे ऑण्टिबायोटिक रेझिस्टन्सचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. अभ्यासानुसार, 83 टक्के हिंदुस्थानी रुग्णांमध्ये असे जीवाणू आढळले आहेत, जे ऑण्टिबायोटिक्सना प्रतिसाद देत नाहीत.
हिंदुस्थानात ऑण्टिबायोटिक रेझिस्टन्स वाढण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे औषधांचा गैरवापर आणि अधिक वापर हे आहे. बहुतांशी लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता ऑण्टिबायोटिक्स घेऊ लागतात, अगदी सर्दी आणि खोकल्यासारख्या किरकोळ संसर्गासाठीही. बऱ्याचदा औषधांचा पूर्ण कोर्स पूर्ण होत नाही, ज्यामुळे बॅक्टेरिया औषधांशी जुळवून घेतात आणि ते पुन्हा परत निर्माण होतात. पशुपालन आणि शेतीमध्ये जास्त ऑण्टिबायोटिक्सचा वापरदेखील या समस्येला कारणीभूत ठरतो. शिवाय चुकीची ऑण्टिबायोटिक निवड स्वतःहून स्वीकारणे, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे आणि रुग्णालयांमधील खराब संसर्ग नियंत्रण प्रणालीदेखील बॅक्टेरियांना बळकटी देतात. हे सर्व घटक सुपरबग्स तयार करत आहेत.23 टक्के रुग्णांमध्ये सर्वात शक्तिशाली ऑण्टिबायोटिक्सनादेखील प्रतिकार करणारे जीवाणू आढळले.
हिंदुस्थानात ऑण्टिबायोटिक्सचा बेसुमार वापर, औषधांची सहज उपलब्धता, चुकीचे प्रिस्क्रिप्शन आणि खराब संसर्ग नियंत्रण यामुळे ही परिस्थिती आणखी बिकट होत आहे.
प्रतिजैविकांचा प्रतिकार या वेगाने वाढत राहिला तर साधे संसर्गदेखील जीवघेणे बनू शकतात. औषधे कुचकामी ठरल्याने उपचार लांब, महाग आणि कठीण होतील. नवीन प्रतिजैविके विकसित करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे भविष्यात हे एक मोठे आरोग्य संकट बनू शकते.



























































