
केंद्र सरकारने कारची सुरक्षा मानके वाढवण्यासाठी क्रॅश टेस्ट आणखी कडक करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ‘भारत एनसीएपी 2.0’ आणण्याची तयारी सुरू केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नव्या नियमांचा मसुदा जारी केला आहे. ऑक्टोबर 2027 पासून हे नवीन आणि अधिक कडक क्रॅश टेस्ट प्रोटोकॉल लागू होण्याची शक्यता आहे.
नव्या नियमांमुळे आता कारची सेफ्टी रेटिंग काढण्याची पद्धत केवळ प्रौढ आणि बाल प्रवाशांच्या संरक्षणापुरती मर्यादित राहणार नाही, तर एकूण पाच सुरक्षा निकषांचा यात समावेश करण्यात आला आहे. नवीन प्रोटोकॉलनुसार, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंगसह एकूण 5 क्रॅश टेस्ट समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी पंट्रोल आणि कर्टन एअरबॅग्ज असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.
फाईव्ह स्टारचे गुण वाढणार
5-स्टार रेटिंग मिळवण्यासाठी आवश्यक असलेले गुण कालांतराने वाढवले जातील. 2027-29 दरम्यान 70 गुण आणि त्यानंतर 2029-31 या काळात 80 गुणांचे लक्ष्य ठेवले जाईल. तसेच प्रत्येक 5 सुरक्षा स्तंभांमध्ये किमान गुण मिळवणे आवश्यक असेल. या नवीन नियमांमुळे कार उत्पादक पंपन्यांना आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेची रचना अधिक मजबूत करावी लागणार आहे, ज्यामुळे रस्त्यांवरील सुरक्षितता वाढण्यास मदत होईल.
कोणते बदल होणार?
क्रॅश प्रोटेक्शन 55 टक्के वेटेज
वल्नरेबल रोड युजर प्रोटेक्शन 20 टक्के वेटेज
अपघात टाळणे 10 टक्के वेटेज
सेफ ड्रायव्हिंग 10 टक्के वेटेज
पोस्ट-क्रॅश सेफ्टी 5 टक्के वेटेज

























































