
>> प्रभाकर पवार, [email protected]
ज्या मुंबई क्राईम ट्रॅचचा आजही जगभरात नावलौकिक आहे, त्या क्राईम ब्रँचची एक शतकापेक्षाही (१९०९) अधिक काळ जुनी असलेली ऐतिहासिक तीन मजली इमारत येत्या काही दिवसांत जमीनदोस्त करण्यात येणार आहे. या आयकॉनिक इमारतीचा काही भाग मोडकळीस आल्याने ही हेरिटेज इमारत पाडण्याचा व त्या जागी सर्व सुविधांनी युक्त अशी इमारत बांधण्याचा निर्णय देवेन भारती यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर घेतला होता. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. इमारत पूर्ण पाडल्यानंतर तेथे वर्षभरात सहा मजली इमारत उभी राहणार आहे. त्यात मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी, कर्मचारी, मुख्य नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) असणार आहे.
८ जून १९०९ रोजी मुंबई क्राईम ब्रँचच्या इमारतीमध्ये क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजेच सीआयडीची शाखा सुरू झाली. या शाखेचे एम.ए.एच. व्हिन्सेंट हे पहिले ब्रिटिश डीसीपी होते. त्यानंतर या शाखेचा हळूहळू विस्तार वाढला. सध्या मुंबई डिटेक्शन क्राईम ब्रँचमध्ये दक्षिण व उत्तर पश्चिम असे दोन डीसीपी काम करतात. मुंबई क्राईम बॅचचे प्रमुख असताना ‘भारताचे शेरलॉ क होम्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमाकांत कुळकर्णी यांनी आपल्या कारकीर्दीत (१९८० च्या दशकात) अतिशय अवघड व संवेदनशील गुन्हयांचा यशस्वीपणे तपास केला होता, तर १९९० ते २००० च्या दशकात क्राईम बॅचचे प्रमुख तसेच सहपोलीस आयुक्त अरविंद इनामदार, आर.डी. त्यागी, एम.एन. सिंग यांनी दाऊद, अरुण गवळी, अमर नाईक या संघटित टोळ्यांना जेरीस आणले होते. अरविंद इनामदार यांनी दगडी चाळीत घुसून अरुण गवळीला स्टेनगनसह टाडा कायद्यान्वये अटक केली होती. अरुण गवळी हा टाडाअन्वये अटक करण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला आरोपी होता. २००० ते २०२० च्या या दोन दशकांत मुंबई क्राईमचे प्रमुख डी. शिवानंदन, मीरा बोरवणकर, डॉ. सत्यपाल सिंग, राकेश मारिया, हिमांशू रॉय, सदानंद दाते, देवेन भारती, मिलिंद भारंबे, उपायुक्त प्रदीप सावंत या अधिकाऱ्यांनी दगडी इमारतीमध्ये अहोरात्र काम करून उरलेसुरले रवी पुजारी टोळीतील गैंगस्टरही संपवून टाकले. सातशेच्या वर गुंड चकमकीत ठार मारून मुंबईत शांतता निर्माण केली. क्राईम बॅचच्या दगडी इमारतीचा अंडरवर्ल्डमध्ये दबदबा आहे. मुंबई क्राईम ब्रँचचे नाव ऐकले की, गुंड टोळ्या आजही चळाचळा कापतात. अशी ही जुन्या स्मृतींना उजाळा देणारी इमारत लवकरच जमीनदोस्त होणार हे ऐकून साऱ्या क्राईम बॅचला व आम्हा पत्रकारांना धक्का बसला आहे.
क्राईम बॅचच्या दगडी इमारतीमधील तळमजल्यावर प्रेस रूम आहे. क्राईम ब्रँचच्या पत्रकार परिषदा याच कक्षात पार पडतात. पोलिसांचे बुलेटिन किवा प्रेस नोट या कक्षातूनच वितरित केली जाते. या कक्षात पत्रकारांची सतत ये-जा असते. ‘नवाकाळ’चे दिवंगत पत्रकार किरण नाबर, ‘जन्मभूमीं’चे सुरेंद्र मोदी. लोकसत्ता’चे विजयकुमार काळे, निशांत सरवणकर, राम पवार, ‘टाइम्स’चे बाळकृष्णन, उस्मान गनी, किरण हेगडे, घनश्याम भडेकर, जे.डी. पाटील, विजयकुमार बांदल, जे.डे.. राजेश पुरंदरे, सुधाकर काश्यप, मंदार परब, संजय सिंग, अभिजित साठे, महेश पांचाळ, अमोल राऊत, अस्लम शेख, रवींद्र राऊळ, सुनील मेहरोत्रा, जितेंद्र दीक्षित, निखिल दीक्षित, अरुण सावरटकर, राजू परुळेकर, सोमित सेन, सुनील सिंग, केल्वीन, प्रसाद नेरूरकर आदी पत्रकारांचा प्रेस रूममध्ये वावर असायचा, परंतु आता पिढी बदलली. बरेच क्राईम रिपोर्टर रिटायर्ड झाले. जुन्या पत्रकारांच्या क्राईम बीट’ही राहिल्या नाहीत. सध्या क्राईम बेंच इमारतीच्या वार्ताहर कक्षात नव्या पिढीचा राबता जास्त असतो. ‘टाइम्स’चे अहमद अली. मतीन हफीज, ‘सामना’चे आशीष बनसोडे, दीपेश मोरे, ज्ञानेश चव्हाण, विशाल सिंग यांची वार्ताहर कक्षात सतत ये-जा असते. हे सारे आता या ऐतिहासिक वास्तूला मुकणार आहेत. मुंबई क्राईम ब्रँच इमारतीमधील वार्ताहर कक्ष हे पत्रकारांचे संवादाचे एक केंद्र आहे. विशेष बातम्या (Exclusive News) येथूनच मिळतात. सर्वात स्फोटक बातम्या याच प्रेस रूममधून डी. शिवानंदन, राकेश मारिया, प्रदीप सावंत, सुरेश वालीशेट्टी या अधिकाऱ्यांनी आम्हा पत्रकारांना दिल्या. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील हे माझ्या ‘गँगवॉर ते बॉम्बस्फोट’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी या वार्ताहर कक्षात एकदा आले होते. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त एम. एन. सिंग, पद्मश्री कुमार केतकर यांचेही माझ्या ‘मुंबईतील रक्त गोठवणारी गुन्हेगारी या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी वार्ताहर कक्षाला पाय लागले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त रॉनी मेन्डोन्सा, रणजित शर्मा यांनीही पोलीस डायरी या माझ्या पुस्तकाच्या गुजराती आवृत्तीचे या वार्ताहर कक्षात प्रकाशन केले होते. त्यामुळे मुंबई क्राईम ब्रँचची इमारत व वार्ताहर कक्ष हा माझ्यासाठी एक हळवा कोपरा आहे. माझ्यासारख्या अनेक वार्ताहरांच्या भावना त्यात आजही गुंतलेल्या आहेत. या इमारतीने जसा पोलिसांना नावलौकिक मिळवून दिला तसे मलाही नावारूपाला आणले आहे हे विसरून चालणार नाही. क्राईम ब्रँचच्या नव्या इमारतीमधील सेवासुविधांबाबत विचारले असता मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती म्हणाले, “जुन्या इमारतीमध्ये बऱ्याच सुविधांचा अभाव होता. परंतु आता नवी इमारत सर्व सुविधांनी युक्त असेल. पत्रकारांसाठी पूर्वर्वीपक्षा अधिक सुविधा असलेला ‘प्रेस रूम’ असणार आहे.” असेही पोलीस आयुक्त म्हणाले.
पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या म्हणण्यानुसार क्राईम ब्रँचच्या नव्या इमारतीला कॉर्पोरेट लुक असणार आहे, परंतु दगडी इमारतीचा गुन्हेगारांमध्ये जो पूर्वीचा दबदबा होता तो आता नसणार आहे. एकेकाळी ‘भारताचे शेरलॉक होम्स’ म्हणून ओळखले जाणारे मुंबई क्राईम ब्रँचचे प्रमुख रमाकांत कुळकर्णी, पोलीस दलातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले अरविंद इनामदार, सुवर्ण पदक विजेते डेप्युटी कमिशनर सामी, अरविंद पटवर्धन आदी अधिकाऱ्यांनी या दगडी इमारतीमध्ये बसून गुन्हेगारांमध्ये आपल्या नावाचा दरारा निर्माण केला होता त्याला तोड नाही. या दगडी इमारतीची शान, प्रतिष्ठा, रुबाब अशाच समर्पित अधिकाऱ्यांनी निर्माण केला होता. दगडी इमारतीचा दबदबा निर्माण करणारे असे अधिकारी क्राईम ब्रँचमध्ये सध्या तरी आम्हाला कुठे दिसत नाहीत असे खेदाने म्हणावेसे वाटते. या दगडी इमारतीने मुंबईकरांना एक डझन पोलीस आयुक्त दिले आहेत. त्यामुळे क्राईम ब्रँचच्या अस्तंगत होणाऱ्या इमारतीचे मोल विलक्षण आहे.
































































