रोजच्या वाहतूककोंडीचा डोसक्याला ताप; 18 लाख ठाणेकरांकडे साडेसोळा लाख गाड्या

मुंबईच्या वेशीला लागून असलेल्या ठाणे शहराची ओळख वाहतूककोंडीचे शहर अशी होऊ लागली आहे. या कोंडीला रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि मेट्रोची अर्धवट कामे कारणीभूत असली तरी शहरातील वाढत्या वाहनसंख्येचाही इफेक्ट होऊ लागला आहे. साधारण १८ लाख लोकसंख्येच्या ठाण्यात तब्बल साडेसोळा लाख वाहने असल्याची आकडेवारी वाहतूक शाखेने जारी केली आहे. या कोंडीतून वेळेत इच्छितस्थळी पोहोचायचे असेल तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा असे आवाहनच वाहतूक शाखेने केले आहे.

मुंबईपाठोपाठ वेगाने विकसित होणाऱ्या ठाणे शहराची लोकसंख्या १८ लाखांच्या घरात आहे. दळणवळणासाठी सुमारे ३८० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत. यात पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि वर्दळीच्या घोडबंदर रस्त्याचा समावेश होतो. ठाणे शहरातील अनेक रस्ते जुने आणि अरुंद आहेत. पार्किंगची सुविधा नसल्याने सर्रास रस्त्यावरच वाहने पार्क केली जातात. ठाण्यात कामासाठी येणारे चाकरमानी आणि उद्योग, व्यवसायासाठी शहरात येणारी अवजड वाहने कुठेही उभी केली जातात. या मुख्य रस्त्यावरील वाहतूककोंडीची झळ अंतर्गत रस्त्यांनाही बसते. अनेक छोट्या इमारतींचा पुनर्विकास होऊन टॉवर उभे राहत आहेत. त्यामुळे लोकसंख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही पाच पट वाढ झाली आहे.

मुदत संपलेल्या गाड्यांचीही गर्दी
ठाण्यात २ लाख ७८ हजार ट्रान्सपोर्ट गाड्या आहेत, तर नॉन ट्रान्सपोर्ट गाड्यांची संख्या १३ लाख ७२ हजार ६७९ इतकी आहे. सध्या ठाण्यात १६ लाख ५१ हजार ३८४ वाहने धावत आहेत. १५ वर्षांचा कालावधी संपलेल्या बेकायदा वाहनांचीही गर्दी असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या नोंदीनुसार
‘टी’ परमीट कॅब ३९,६५८ वाहने
पीकअप टेम्पो १,३८,१६२
रुग्णवाहिका १,११२
ऑटो रिक्षा ८९,०४७
दुचाकी १०,४२,३०७
चारचाकी ३१५९८५