
वसई शहरातील गजबजलेल्या दिवाणमान परिसरात आज पाण्याच्या टाकीच्या व्हॉल्वची दुरुस्ती सुरू असताना त्याचा धक्का क्लोरिनच्या टाकीला बसला. त्यातून विषारी वायूची गळती झाल्याने असंख्य नागरिकांचा जीव घुसमटला. या वायूची बाधा १३ जणांना झाली आहे. यातील देव पारडीवाला (५९) यांचा मृत्यू झाला आहे, तर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू आहेत.
दिवाणमान येथे वसई-विरार महानगरपालिकेची पाण्याची टाकी असून त्याद्वारे परिसरात पुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी या टाकीचा व्हॉल्व बिघडला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू झाली. आज पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक दुरुस्तीसाठी गेले होते. त्याच्या पाठीमागच्या बाजूला एका खोलीत १५ वर्षे जुनी क्लोरिन वायूची टाकी ठेवली होती. दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक एका कर्मचाऱ्याचा धक्का क्लोरिनच्या टाकीला लागला आणि ही टाकी जमिनीवर कोसळली.
इमारत रिकामी केली
क्लोरिनची टाकी खाली कोसळताच त्यातून मोठ्या प्रमाणावर वायूची गळती सुरू झाली. परिसरामध्ये हा वायू पसरल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांमध्येही घबराट पसरली. या विषारी वायूमुळे १३ जणांना त्रास सुरू झाल्याने त्यांना रुग्णाल यात दाखल केले. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान व महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने धाव घेऊन पाण्याच्या टाकीसमोरील दोन इमारती रिकाम्या केल्या. तसेच वायूगळती थांबवली.





























































