
जुगाराच्या प्रकरणी लाच मागणाऱ्या रामतीर्थ पोलीस ठाण्यातील ASI वर ACB ने कारवाई केली आहे. जुगाराच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी न मागण्यासाठी त्यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ जांभळीकर याच्याविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ नोव्हेंबर रोजी तक्रारदार पत्ते खेळताना आढळून आला. त्यामुळे रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दशरथ जांभळीकर याने आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात तक्रारदाराला पोलीस कोठडी न घेता तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे जांभळीकरने १० हजारांची मागणी केली. तसेच अमजद पठाण याने तक्रारदाराला फोनवर सांगितले की, मला तीस हजार रुपये दिले असते, तर तुमचे सर्व गुन्हे मी अंगावर घेतले असते, मी जांभळीकर यांना सांगते तक्रारदार येत आहेत. त्यांना पैसे देऊन टाका असे म्हणून लाच देण्यास प्रोत्साहन दिले.
या तक्रारीची पडताळणी नांदेडच्या एसीबी पथकाने २२ नोव्हेंबर रोजी केली. तेव्हा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दशरथ जांभळीकरने शासकीय पंचासमक्ष 10 हजारांची मागणी स्वतः साठी केली आणि लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविली. तसेच अमजद पठाण याने तक्रारदाराला जांभळीकर यांना फोनवर लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी २३ व २४ नोव्हेंबर रोजी जांभळीकरवर एसीबी पथकाने सापळा लावला परंतु दोन्ही आरोपींना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही.
आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच रामतीर्थ ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक साईप्रकाश चन्ना यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई सापळा अधिकारी साई चन्ना यांनी पर्यवेक्षण अधिकारी प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात केली. तपास अधिकारी म्हणून अनिता दिनकर काम पाहत आहेत.






























































