
जर पत्नीचे उत्पन्न स्थिर नसेल किंवा ती स्वतःचा आणि आपल्या मुलाचा खर्च उचलू शकत नसेल तर ती पोटगीसाठी पात्र आहे. तिला पतीकडून पोटगी मिळायला हवी. तिला पोटगी मिळण्यापासून वंचित ठेवता येऊ शकणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय केरळ उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणात दिला आहे. न्यायाधीश कौसर एडप्पगाथ यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत हा निकाल दिला. पत्नीची कमाई करण्याची क्षमता आणि प्रत्यक्षात पुरेसे उत्पन्न मिळवणे यात फरक आहे. पतीपासून वेगळे राहिल्यानंतर या महिलेने पोटगीसाठी कोर्टात धाव घेतली होती. या महिलेने कोर्टात सांगितले की, तिला शिवणकाम येते, परंतु तिला कायमस्वरूपी काम नाही. तसेच शिवणकाम केल्यानंतरही त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. पतीकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. त्यामुळे नाईलाजाने तिने पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पतीकडून रोज तिला मारहाण केली जात होती. या जोडप्याला दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले या महिलेसोबत राहतात. महिलेने मुलांसाठी आणि स्वतःसाठी पतीकडून पोटगीची मागणी केली होती. महिलेचा पतीही एक शिंपी आहे. महिलेने तिच्या पतीकडून स्वतःसाठी दरमहा 15 हजार आणि तिच्या दोन्ही मुलांसाठी प्रत्येकी 10-10 हजार रुपये पोटगीची मागणी केली आहे.























































