माणगावजवळ दुर्घटना, दोन तास वाहतूक ठप्प; शिवशाहीला अपघात, एक ठार, दहा जखमी

माणगावपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कळमजे पुलाजवळ सकाळी शिवशाही बस व सीएनजी ट्रक यांची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात एक प्रवासी ठार तर १० जण जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती. या वाहतूककोंडीचा फटका प्रवाशांना बसला. दरम्यान हा अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईहून मालवणच्या दिशेने शिवशाही बस जात होती. ही बस सकाळी सवासातच्या सुमारास माणगावच्या कळमजे पुलाजवळ येताच मालवणहून मुंबईकडे जाणाऱ्या सीएनजी ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. जोरदार धडक बसल्याने बसमधील प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडू ल ागले. हा अपघात एवढा भीषण होता की बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले. अपघातामध्ये दहा प्रवासी जखमी झाले आहेत. बसचा दर्शनी भाग अक्षरशः कापून काढावा लागला. या दुर्घटनेत श्यामसुंदर गावडे (८५) या वृद्ध प्रवाशाचा मृत्यू झाला असून दहाजण जखमी झाले आहेत.

अपघाताचे वृत्त समजताच पोलीस, रुग्णवाहिका व आपत्कालीन पथकाने तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूकडील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली. ट्रकमध्ये सीएनजीचे सिलिंडर्स होते. दैव बलवत्तर म्हणून या सिलिंडरचा स्फोट झाला नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. मुंबई-गोवा महामार्गावर सहा ते आठ किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

जखमींची नावे
अंकुश मेस्त्री (५४, आचरा मालवण), शशिकांत तावडे (७२, पन्हाळे, जि. रत्नागिरी), प्रशांत राजेशिर्के, (४०, शिंदेवाडी कोडमला, जि. रत्नागिरी), सुप्रिया मोरे, (५५, विक्रोळी), प्रतिभा नागवेकर (५९, संगमनेर, जि. रत्नागिरी), आर्या मयेकर (३८, संगमेश्वर, जि. रत्नागिरी), गायत्री मयेकर (१३, संगमेश्वर, जि. रत्नागिरी), अक्षता पोळवणकर (४०), दीपाली मोकल (३०, आमटेम, जि. रायगड), आयशा मयेकर (६, संगमेश्वर, जि. रत्नागिरी).