
वीटभट्टीवरील विटांचे काम पूर्ण न केल्याची शिक्षा म्हणून मालकाने दोन नवजात बालके, त्यांच्या मातांसह सहा जणांचे अपहरण केल्याची संतापजनक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी वीटभट्टीमालकाला पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली. दरम्यान याप्रकरणी अपहरणकर्त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
माणगाव आदिवासी वाडी येथील दर्शन मिरकुटे यांनी वीटभट्टीवर विटांचे काम करण्यासाठी समीर नजे व अब्दुल्ला नजे यांच्याकडून २७ हजार ५०० रुपये आगाऊ घेतले होते. मात्र मिरकुटे यांच्या दोन्ही पत्नींची प्रसूती झाल्याने त्यांना वीटभट्टीवर जाता आले नाही. त्याचा राग म्हणून पैसे परत देण्यासाठी मिरकुटे यांच्यावर दबाव टाकण्यात आला. १९ नोव्हेंबर रोजी मिरकुटे हे घरी नसल्याची संधी साधून नजे पितापुत्रांनी दोन नवजात बालके, त्यांच्या माता आणि चार वर्षांच्या दोन मुली अशा सहा जणांना टेम्पोत घालून त्यांचे अपहरण केले.
दुप्पट पैसे देण्यासाठी दबाव
नजे यांनी सहाही जणांना एका पडीक घरात सात दिवस ठेवले. एवढेच नव्हे तर त्या दोन्ही बाळंतिणींना जबरदस्तीने वीटभट्टीवर काम करण्यास भाग पाडले. दुप्पट पैसे दिले तरच सर्वांची सुटका करू असा दम मिरकुटे यांना दिला. ही बाब गावातील आदिवासी बांधवांना समजताच ग्रामस्थांनी थेट नेरळ पोलीस ठाणे गाठले आणि सर्व घटना सांगितली. पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी त्वरित समीर नजे व अब्दुल नजे यांना पोलीस ठाण्यात बोलावून दम दिला. त्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.
























































