
पोस्टाच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्या महिलेने नागरिकांना 95 लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. कामिनी पेडणेकर असे तिचे नाव आहे. तिच्याविरोधात खांदेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नवीन पनवेलमधील सेक्टर ६ मध्ये राहणाऱ्या रुचिरा कौशिक यांना कामिनीने पोस्ट ऑफिसमध्ये एजंट असल्याचे सांगून आरडी व एमआयएस स्कीममध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार रुचिरा यांनी १५ लाखांची गुंतवणूक केली. दरम्यान, कामिनी यांनी रुचिरा यांचे पोस्टाचे पासबुक व सही केलेल्या दोन कोऱ्या विड्रॉल स्लिप स्वतःकडे ठेवल्या. रुचिरा यांना संशय आल्याने त्यांनी पोस्टात चौकशी केली असता कामिनीचे बिंग फुटले. कामिनीने याआधीही दत्तात्रेय मिसाळ यांची ३० लाख, लक्ष्मी भट यांची साडेआठ लाख, अदिती मुरकर यांची ३८ लाखांची फसवणूक केली आहे.
दोन खंडणीखोरांवर गुन्हा
डोंबिवली : ज्वेलर्स मालकाला घरी बोलावून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांवर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नारायणलाल रावल (४०) असे सोनाराचे नाव आहे. रावलयांना अॅडव्हान्स पेमेंट घेण्यासाठी घरी बोलवून महिला व तिच्या साथीदाराने त्यांचे हातपाय बांधून लुटले. शिवाय पाच लाख खंडणीही मागितली.




























































