
देशातील १२ राज्यांमध्ये मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमुळे वाद निर्माण झाला आहे आणि या कामात काम करणाऱ्या BLOs च्या मृत्यूची प्रकरणे देखील समोर येत आहेत. काल सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआरमुळे आता २८ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत, असं वृत्त ‘टीव्ही ९ भारतवर्ष’ने दिलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) प्रक्रिया सुरू आहे. यातच ७८ टक्के मतदारांचे फॉर्म डिजिटायझेशन करण्यात आले आहेत. तर २२ टक्के शिल्लक आहेत. यातूनच २८ लाख लोकांचे अर्ज वगळण्यात आले आहेत. या २८ लाख मतदारांपैकी ९००,००० जणांचे निधन झाले आहे. उर्वरित मतदार बेपत्ता आहेत, म्हणूनच त्यांची नावे वगळण्यात आली आहेत, असं वृत्त ‘टीव्ही ९ भारतवर्ष’ने निवडणूक आयोगाच्या हवाल्याने दिलं आहे.
वृत्तानुसार, निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पश्चिम बंगालच्या सध्याच्या मतदार यादीतील सुमारे २६ लाख मतदारांची नावे २००२ च्या मतदार यादीशी जुळत नाहीत. २००२ ते २००६ दरम्यानच्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान विविध राज्यांमध्ये तयार केलेल्या याद्यांशी राज्याच्या नवीन मतदार यादीची तुलना केली असता ही तफावत उघड झाली.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एनआरसीवरून केंद्र सरकारवर सातत्याने हल्ला करत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले आहेत. बुधवारी त्यांनी म्हटले की, “हे एक षड्यंत्र आहे, मागच्या दाराने एनआरसी राबवण्याचा कट आहे.”


























































