
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोहा येथील सभेत गोंधळ घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड वर्गीकरणाची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी सभेत प्रचंड घोषणाबाजी करून गोंधळ निर्माण केला. यामुळे सभेला व्यत्यय आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी लोहा येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मंत्री पंकजा मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री भाषण करीत असतानाच मातंग समाजाच्या सहा ते आठ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. “अनुसूचित जाती अ, ब, क, ड वर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करा”, “मातंग समाजाला न्याय द्या”, “सरकारचा निषेध असो” अशा घोषणा त्यांनी दिल्या. यामुळे सभेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. अनुसूचित जातीच्या वर्गीकरणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तरीही काही काळ घोषणाबाजी सुरूच होती. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देगलूर येथील सभेतही असाच गोंधळ घालण्यात आला होता. सत्ताधारी पक्षाच्या सभांमध्ये अशा प्रकारच्या घोषणाबाजीचे प्रमाण वाढले असून, लोहा येथेही त्याची पुनरावृत्ती झाली. पोलिसांनी वेळीच कारवाई करून संबंधित तरुणांना सभास्थलाबाहेर काढले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने ‘माझी लाडकी बहिण’ योजना, शहर स्वच्छता अभियान आणि इतर विविध योजनांचा उल्लेख करीत आश्वासनांचा पाऊस पाडला. मात्र लोहा-कंधार मतदारसंघासाठी कोणतीही ठोस घोषणा केली नाही. यामुळे उपस्थितांमध्ये निराशा पसरली. लोहा येथे घराणेशाहीचा मुद्दा प्रचंड चर्चेत आहे. सूर्यवंशी कुटुंबातील सहा सदस्य या निवडणुकीच्या रिंगणात असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह कुटुंबातील एकूण सहा जण निवडणूक लढवत आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांनी याबाबत एकही शब्द काढला नाही.

























































