
अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीने हिंदुस्थानात मोठा गाजावाजा करत आपल्या कंपनीचे वाय मॉडेल लाँच केले, परंतु या कारच्या किमती भरमसाट आणि आवाक्याच्या बाहेर असल्याने टेस्लाच्या कारकडे ग्राहकांनी चक्क पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. देशात सप्टेंबर महिन्यात केवळ 61 कारची विक्री झाली असून मुंबईत 41, दिल्लीत 11 आणि पुण्यात 5 कारची प्रामुख्याने विक्री झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात या विक्रीत घसरण झाली असून केवळ 40 कारची विक्री करण्यात टेस्ला कंपनीला यश आले आहे. म्हणजे दोन महिन्यांत मोजून 100 कारची विक्री कंपनीला करता आली आहे. दोन महिन्यांत कंपनीने किमान 500 कारची विक्री करायला हवी होती, असा अंदाज अनेकांनी बांधला होता. फाडाच्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानात ईव्ही बाजारात ऑक्टोबरमध्ये एकूण 18 हजार 055 युनिट्सची विक्री झाली आहे. सप्टेंबरमध्ये ही आकडेवारी 15,329 होती. त्यातुलनेत टेस्लाला भरीव कामगिरी करता आली नाही.
20 लाखांनी स्वस्त होणार
टेस्ला कारची किंमत जास्त असल्याने ग्राहकांचा कल दुसऱ्या कारकडे जात आहे. त्यामुळे टेस्ला कंपनी येत्या चार ते पाच वर्षांत 20 लाख रुपयांनी स्वस्त करण्याच्या विचारात आहे. आता 60 लाखांना मिळणारी कार भविष्यात 40 लाखांपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानात ईव्ही कार 20 ते 30 लाखांपर्यंत मिळत असताना टेस्लाची किंमत मात्र 60 लाखांपर्यंत आहे. म्हणजेच ही कार तिप्पट महाग आहे. तसेच अमेरिकेच्या तुलनेत टेस्लाचे वाय मॉडेल 70 टक्के अधिक महाग आहे.





























































