इम्रान खान यांच्या मृत्यूची अफवा; बहिणी म्हणतात खरं सांगा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूबाबत पाकिस्तानात मोठी अफवा उडाल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इम्रान खान हे रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात कैद आहेत. तुरुंग प्रशासनाकडून त्यांच्या बहिणींनी त्यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात येत आहे. बहिणींच्या आंदोलनानंतर तुरुंग प्रशासनाने इम्रान खान यांच्याबाबत माहिती दिली. ते जिवंत असून त्यांच्या मृत्यूची केवळ अफवा असल्याचे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र आंदोलनाला बसलेल्या त्यांच्या बहिणींवर लाठीमार केल्यानंतर इम्रान खान यांच्या पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

इम्रान खान हे आदियाला तुरुंगात भ्रष्टाचारप्रकरणी 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. इम्रान यांच्या बहिणी अलीमा खान, नोरिन नियाजी आणि डॉ. उज्मा खान या भावाला भेटण्यासाठी तुरुंगाबाहेर धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. न्यायालयाचा आदेश असूनही इम्रान यांना तीन आठवडय़ांपासून बहिणींना भेटू देण्यात आलेले नाही.

इम्रान यांना तुरुंगात फाईव्ह स्टार सुविधा
या सर्व वादानंतर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, इम्रान यांना तुरुंगात टीव्हीसोबतच जिम व इतर सुविधा आहेत. त्यांच्यासाठी डबल बेड असून मखमली गादीवर ते झोपतात. जेवणही त्यांच्यासाठी बाहेरून येते.