
वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठीच्या मेगा लिलावात गुरुवारी खेळाडूंची कोटीच्या कोटी उड्डाणे बघायला मिळाली. महिला क्रिकेटपटूंच्या या बाजारात हिंदुस्थानची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा ही मार्की राऊंडमध्ये सर्वात महागडी ठरली. दिल्ली कॅपिटल्सने तिच्या बेस प्राइसवर एकमेव सुरुवातीची बोली लावल्यानंतर यूपी वॉरियर्सने आरटीएम कार्ड वापरत 3.2 कोटी रुपयांना तिला परत संघात घेतले.
दीप्तीनंतर न्यूझीलंडची एमिलिया केर ही दुसरी महागडी खेळाडू ठरली. तिला मुंबई इंडियन्सने तीन कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले. एमिलियासाठी मुंबई इंडियन्सने एपूण उपलब्ध पर्सच्या अर्ध्याहून अधिक रक्कम खर्च केली. सर्वात मोठी पर्स आणि चार आरटीएम कार्ड्ससह लिलावाला सुरुवात करणार्या यूपी वॉरियर्सने सर्वाधिक बोली लावल्या. दिल्लीने इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनला फक्त 85 लाखांत घेतल्यावर यूपीने तिलादेखील आरटीएमने परत मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगसाठीही दिल्लीविरुद्ध जोरदार बोली लढत झाल्यानंतर यूपीने 1.9 कोटींना तिला साइन केले. मार्की राऊंड संपेपर्यंत यूपीने 8 पैकी 3 मार्की खेळाडू मिळवले आणि त्यांचे 4 पैकी 2 आरटीएम कार्ड वापरले.
दिल्ली कॅपिटल्सने लॉरा वूल्व्हार्टला 1.1 कोटींना घेतले.
गुजरात जायंट्सने रेणुका सिंगला 60 लाखांत घेतले आणि नंतर सोफी डिवाइनसाठी तीन संघांशी जुगलबंदी करीत 2 कोटींना लढत जिंकली.
दिवसातील सर्वात मोठा धक्का म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार ऑलिसा हिलीला (बेस प्राइस 50 लाख) कोणताही संघ बोली लावण्यास पुढे आला नाही.
यूपीने फिबी लिचफिल्डला 1.2 कोटींना घेतले.
किरण नवगिरेला 60 लाखांत आरटीएमने परत घेतले.
दिल्लीने श्री चारणी आणि चिनेले हेन्रीला प्रत्येकी 1.3 कोटींना साइन केले.
गुजरातने भारती फुलमालीला आरटीएमने 70 लाखांत परत घेतले.
आरसीबीने नदीन दे क्लार्प आणि राधा यादवला प्रत्येकी 65 लाखांत जोडले.
यूपीने हरलीन देओलला बेस प्राइस 50 लाखांत घेतले.
यूपीने आशा सोभनाला 1.1 कोटींना घेतले आणि शेवटचा आरटीएम वापरत क्रांती गौडला बेस प्राइस 50 लाखांत परत घेतले.
मुंबईने शबनिम इस्माईलला 60 लाखांत परत साइन केले.
गुजरातने टायटस साधूला 30 लाखांत साइन केले.
आरसीबीने लॉरेन बेलला 90 लाखांत आणि लिन्से स्मिथला 30 लाखांत घेतले.
दिल्लीने लिझेल लीला 30 लाखांत घेतले.
उम चेत्री, एमी जोन्स आणि इसाबेला गेज यांच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही.
अलाना किंग, अमांडा-जेड वेलिंग्टन, डार्सी ब्राऊन, सायका इशाक, प्रिया मिश्रा आणि लॉरेन चीटल या गोलंदाजांना मात्र कोणतीही बोली मिळाली नाही.





























































