ज्येष्ठ ध्वनिमुद्रक अविनाश ओक यांचा सन्मान

ज्येष्ठ ध्वनिमुद्रक अविनाश ओक यांचा स्वरसन्मान सोहळा नुकताच विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या पटांगणावर उत्साहात पार पडला. अविनाश ओक यांच्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे आणि कारकीर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्तीचे औचित्य साधून ‘नादस्मृती उलगडताना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘नादस्मृती उलगडताना’ या कार्यक्रमाची सुरुवात मंदार आपटे यांनी गायलेल्या ‘ओंकार स्वरूपा’ या गीताने झाली. निवेदिका समीरा गुजर यांनी सुरुवातीलाच अविनाश व श्रीधर फडके यांना बोलते केले व आठवणीचा खजिना खुला केला. ‘भरून भरून आभाळ आलय’ हे गीत अर्चना गोरे यांनी तर श्रीधर फडके यांचे ‘तुला पहिले मी नदीच्या किनारी’ हे गीत ऋषिकेश रानडे यांनी सादर करून रसिकांची वाहवा मिळविली.

आर्च एंटरप्राईजने आयोजित केलेल्या या सोहळय़ात सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या हस्ते अविनाश ओक यांना पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व 51 हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला सुरेश वाडकर, रेखा भारद्वाज, ललित पंडित, अवधूत गुप्ते, सौरभ खेडेकर, विनीत गोरे, अंजली ओक आदी उपस्थित होते.