बदलापूर-कर्जत लोकल प्रवास सुपरफास्ट; तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेसाठी 1324 कोटी मंजूर

मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर-कर्जत लोकलप्रवास लवकरच सुपरफास्ट होणार आहे. या मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामासाठी केंद्राने १ हजार ३२४ कोटी रुपये मंजूर केले असून या कामाचा लवकरच शुभारंभ होणार आहे. त्यामुळे भविष्यात थेट कर्जतपर्यंत जलद गाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

बदलापूर-कर्जत या दोन मार्गिकांवरून मुंबई-पुणे-सोलापूर-चेन्नई व दक्षिण हिंदुस्थानात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस व माल गाड्यांचीही वाहतूक होते. यामुळे अनेकदा लोकल सायडिंगला टाकल्या जातात. प्रवाशांची होणारी लटकंती लक्षात घेता खासदार तथा केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य सुरेश म्हात्रे यांनी तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेसाठी पाठपुरावा केला होता. अखेर याला यश आले असून केंद्र सरकारने १३२४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

५० टक्के निधी राज्य शासन देणार
३२.४६ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी ५० टक्के केंद्र शासन व ५० टक्के राज्य शासन निधी देणार आहे. त्यामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यानच्या लोकल सेवांमध्ये वाढ होणार असून लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगळी मार्गिका उपलब्ध होणार आहे. मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर गाड्यांची संख्या वाढणार असून भविष्यात जलद लोकल धावतील अशी माहिती खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिली.