रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन ४-५ डिसेंबरला हिंदुस्थान दौऱ्यावर

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन पुढच्या आठवड्यात ४-५ डिसेंबरला हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पुतीन हे राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे. तसेच त्यांच्या या दौऱ्यात कच्चे तेल, संरक्षण आणि व्यापारासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. अमेरिकेशी व्यापाराच्या मुद्द्यावर हिंदुस्थानच्या वाढलेल्या तणावाच्या परिस्थितीत पुतीन यांच्या या दौऱ्यावार महत्त्व प्राप्त झाले आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अलिकडेच रशियाच्या दौऱ्यावर जाऊन आले. या दौऱ्यात रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांनी पुतीन लवकरच हिंदुस्थानचा दौरा करतील, असे म्हटले होते. जयशंकर यांच्या रशियाच्या दौऱ्यानंतर काही दिवसांतच पुतीन हे हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येत आहेत.

रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने हिंदुस्थानवर टॅरिफ लादला आहे. रशियाकडून हिंदुस्थानने कच्चे तेल खरेदी थांबवावी, यासाठी अमेरिकेने मोठा दबाव आणला आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-हिंदुस्थानच्या संबंधांवर टिप्पणीही केली आहे. यामुळे पुतीन यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मनला जात आहे.