संसदेत वंदे मातरम् बोलणारच बघू कोण रोखतो! – उद्धव ठाकरे

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम् बोलणारच आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर आमच्या सदस्यांना त्यांनी निलंबित करून दाखवावं? असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला दिले आहे. राज्यसभेत सदस्यांसाठी सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सभागृहात थँक्यू, जय हिंद किंवा वंदे मातरम् म्हणू नये. म्हणजे हे तर अनाकलनीय आहे. आजपर्यंत आम्ही भाजपच्या सोबत होतो तो भाजप इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा असं ठणकावून सांगायचा. आता वंदे मातरम् म्हणायचं नाही. हे ज्याने केलंय तो पाकिस्तानमध्ये जाणार का? त्याला पाकिस्तानमध्ये पाठवणार का? हे भाजपने सांगावं की यामध्ये कुठलं हिंदुत्व किंवा राष्ट्रप्रेम आहे का? असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

एका बाजूला मी यांचा हिंदुत्वाचा बुरखा फाडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला यांच्या राष्ट्रप्रेमाचा बुरखा सुद्धा मी फाडलेला आहे. कारण तो त्यांनीच स्वतःहून फाडलेला आहे. म्हणजे आपल्या सभागृहात वंदे मातरम् म्हणायचं नाही? वंदे मातरमला दीडशे वर्षे झाली म्हणून नुकतचं मोदीजींनी कुठेतरी मोठं भाषण दिलं. वंदे मातरमला विरोध करणारी ही मॅकलेची अवलाद भाजपमध्ये कुठून आली? मोदींना विचारलं पाहिजे की ही अवलाद तुमच्यामध्येच आहे की ती वंदे मातरमला विरोध करतेय. त्याच्यामुळे आमचे सर्व खासदार लोकसभेतही आहेत आणि राज्यसभेत संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी हे खासदार आहेत. सभागृहात ठणठणीतपणे वंदे मातरम् बोलायचं, बघूया कोण आपल्याला बाहेर काढतंय? शिवसेनेचे खासदार लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम बोलणारच आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर आमच्या सदस्यांना त्यांनी निलंबित करून दाखवावं? पण हा खेळखंडोबा चाललेला आहे. म्हणजे लोकांमध्ये एक भावनिक संभ्रम निर्माण करायचा, मतं मिळवायची आणि मतं मिळवल्यानंतर सगळं मारून टाकायचं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हिंदुत्वाचं सुद्धा नाटक आता तुमचं उघडं पडलं आहे. राष्ट्रप्रेमाचं नाटक उघडं पडलेलं आहे. याची उत्तरं निवडणुका बाजूला ठेवून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी द्यावीत, इथल्या चेल्याचपाट्यांनी नव्हे. इथल्या चेल्याचपाट्यांना आम्ही खीजगणतीत धरत नाही. कारण त्यांचा अध्यक्षच अजून ठरत नाहीये. जगातला सर्वात मोठा पक्ष की ज्याला बरेच वर्षे झाली त्याला अध्यक्ष बदलताना नामुष्की आलेली आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? आणि आपल्या संसदेच्या सभागृहात वंदे मातरम् का बोलायचं नाही? याचं उत्तर आता भाजपने द्यावं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.