क्रिकेटनामा – बस्ती में एका हो गया!

>> संजय कऱ्हाडे

लगता हैं, बस्ती में एका हो गया! काल सामन्यात दिसलेला एकोपा उत्साह देणारा होता. सामना सुरू होण्यापूर्वीच्या हड्लमध्ये संघाला प्रोत्साहन देणारे शब्द रोहित शर्माचे होते अन् कप्तान राहुलसह सर्व खेळाडूंनी आपापल्या कानांचे सूप केले होते. साऱया माना होकारार्थी हलत होत्या. नंतर, रोहित आणि कोहलीच्या अर्धशतकांना गौतम गंभीरची हसरी शाबासकीही मिळताना दिसली. रो-कोची शैलीदार भागीदारी पाहणाऱयांचा रविवार सणासारखा साजरा झाला. आणि विराट कोहलीच्या शतकाची तर कशी सांगावी कहाणी! आहा, काय रुबाब होता त्याचा! शेर की चाल थी, चील की नजर थी, और थी हातातल्या बॅटीला बिजली की चमक. आवडत्या मैदानावर शतक झळकावल्यावर विराटने गगनात भरारी मारली, तर गौतम गंभीरच्या टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला! आपल्यासारख्या क्रिकेटप्रेमींसाठी तर दिवस होता केवळ जल्लोषाचा! याच अन् अशाच एकोप्याची बात आपण काल केली होती!

एकीकडे गुढघ्यावर बसून सुब्रायमला शानदार लागोपाठ षटकार ठोकत रोहित बॅटीने स्वतःलाच शाबासकी देताना दिसला आणि दुसरीकडे विराट षटकारांची बरसत करताना! जबरदस्त आक्रमक असं बावन्नावं शतक फटकावताना त्याने दक्षिण आफ्रिकन गोंदाजांना मैदानाचा एक एक काना-कोपरा दाखवला. अकरा चौकार अन् सात षटकार! दोन्ही गुणी आणि बहादूर खेळाडूंनी आपापली परीक्षा टक्केच्या टक्के मिळवून पास केली. चॅम्पियन ट्रॉफीनंतर खेळलेल्या चार सामन्यात रोहितचं एक शतक आणि दोन अर्धशतपं, तर विराटचं एक शतक आणि एक अर्धशतक! रो-कोच्या आतिषबाजीनंतर राहुलनेही अर्धशतक लुटलं. आफ्रिकेसमोरचं तब्बल 350 धावांचं आव्हान मोठ्ठं होतं आणि त्यांनी जवळपास ते पार केलंच होतं! प्रसिद्धने बॉशला बाद करेपर्यंत जीव टांगणीला लागला होता.

फक्त अकरा धावांवर तीन फलंदाज बाद झाल्यानंतर झोर्जी, ब्रेव्हिस, बॉश मंडळीने धाकधुक वाढवली होती. ब्रिट्झकी आणि यान्सनने तर त्यांच्या धडाकेबाज भागीदारीने धडकीच भरवली. शेवटी बॉशला प्रसिद्धने बाद केलं आणि विजय मिळाला. एक मात्र खरं, अशा ठणठणीत खेळपट्टया जर उरलेल्या सामन्यांसाठीही असल्या तर ही मालिका डोंगराहून मोठया धावसंख्येसाठी ओळखली जाईल.

एकोप्याचा नेमका काय अर्थ असतो हेच जणू काल संघाने दाखवून दिलं. कठीण समयी कप्तान राहुलला रो-कोचा अनुभव रस्ता दाखवून गेला. राणा, अर्शदीपच्या खांद्याला कुलदीप आणि प्रसिद्धने आपला खांदा लावून आफ्रिकेला रोखलं. विजय मिळाला. विराटची आरोळी परत आलेली दिसली. संघाचा एकत्रित संवाद पाहता वाटलं पुन्हा एकदा सगळं कुटुंब एका घरात राहायला परतलंय!