
उपनगरी रेल्वेचे वेळापत्रक दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. अनेक वर्षांपासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाची बोंब आहे. त्यापाठोपाठ पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा कोलमडला आहे. चर्चगेटहून बोरिवली, विरार आणि डहाणूकडे धावणाऱया लोकल ट्रेनचा ‘रिटर्न प्रवास’ विलंबाचा बनला आहे. या गाडय़ा 10 ते 15 मिनिटे उशिराने चर्चगेट स्थानकात येत आहेत. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणाऱया लोकल गाडय़ांना 10 ते 20 मिनिटांचा लेटमार्क लागत आहे.
‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ असलेली उपनगरी रेल्वे पूर्वी निर्धारित वेळेत सेवा देत असायची. मध्य रेल्वेच्या मेन लाइन, हार्बर आणि ट्रान्स हार्बरसह पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनचा वक्तशीरपणा काwतुकाचा विषय राहिला होता. मात्र अलीकडच्या काळात दोन्ही मार्गांवर वेळेचे गणित बिघडले आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे वाढलेले प्रमाण, एसी लोकलची अधिक संख्या, सेक्शन पंट्रोलरचा नियोजनामध्ये उडणारा गोंधळ अशा विविध कारणांमुळे लोकल ट्रेनचे वेळापत्रक कोलमडले आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट स्थानकातून लोकल ट्रेन वेळेवर सुटतात, मात्र विरार-डहाणूपर्यंतच्या दीड-दोन तासांच्या प्रवासात त्यांचे वेळापत्रक कोलमडते. त्यामुळे त्या ट्रेनचा अप मार्गावरील परतीचा प्रवास रडतखडत सुरू असतो. गेल्या काही महिन्यांत पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन चर्चगेटला 10 ते 15 मिनिटे उशिराने दाखल होत आहेत. यामागे अनेकदा गर्दीच्या वेळेत एसी लोकलचे दरवाजे वेळेत बंद होत नसल्याचे प्रमुख कारण असते. तसेच ट्रेनमधून प्रवासी पडला तर त्यात पुन्हा वेळ जातो, असे पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱयाने सांगितले. मध्य रेल्वे मार्गावर काही मोजक्याच ट्रेन परतीच्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचतात. बहुतांश ट्रेन 10 ते 20 मिनिटे उशिराने दाखल होत आहेत. त्याचा लोकल सेवेच्या संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम होऊन प्रवाशांची दरदिवशी गैरसोय होत असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.
प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसलेले ‘पंट्रोलर’
लोकल सेवेचे नियंत्रण ‘सेक्शन पंट्रोलर’च्या हाती असते. कुठल्या ट्रेनला सिग्नल द्यायचा? ट्रेन कोणत्या मार्गावरून वळवायची? याचे नियोजन ‘सेक्शन पंट्रोलर’ करतात. पूर्वी ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्तरांना ‘सेक्शन पंट्रोलर’ म्हणून नेमणूक मिळायची. आता लोकल वाहतुकीच्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसलेल्या कर्मचाऱयांना ‘सेक्शन पंट्रोलर’चे काम सांभाळावे लागत आहे. त्यांना लोकल सेवेचे योग्यरीत्या नियोजन करता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

























































