‘एसआयआर’ला सात दिवसांची मुदतवाढ

विरोधकांचे आक्षेप व नागरिकांच्या नाराजीनंतर पेंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेला सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता मतदारांना 11 डिसेंबरपर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी वा दुरुस्ती करता येणार आहे.

बिहारनंतर निवडणूक आयोगाने 12 राज्ये व पेंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू केली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया 4 डिसेंबर रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र या प्रक्रियेतून जाताना मतदारांना अनेक अडचणी येत आहेत. तसेच बूथ पातळवरील अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. त्यातून अनेकांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे राजकीय पक्षांनी एसआयआर थांबवण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आयोगाने वेळ वाढवली आहे. नव्या वेळापत्रकानुसार 11 डिसेंबरपर्यंत सर्व मतदारांचे फॉर्म भरून घेतले जातील. त्यानंतर 16 डिसेंबरला प्राथमिक मतदार यादी प्रकाशित होईल. त्यानंतर हरकती सूचना मागवून अंतिम यादी 14 फेब्रुवारी रोजी प्रकाशित केली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात डिसेंबरमध्ये सुनावणी

‘एसआयआर’विरोधात तामीळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर पेंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला 1 डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. केरळच्या याचिकेवर मंगळवारी, तर तामीळनाडूच्या याचिकेवर 4 डिसेंबर आणि पश्चिम बंगालच्या याचिकेवर 9 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.