
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिंदे गटाचे उमेदवार तुकाराम म्हात्रे यांनी अजित पवार (दादा) गटाच्या उमेदवारावर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला. या ‘लक्ष्मीदर्शन’वरून दोन्ही गटात राडा झाला.
एका गृहसंकुलात प्रचार चिठ्यांसह पैसे असलेले लिफाफे वाटत असलेल्या महिलांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. त्यावेळी या महिलांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तेथे अजित पवार गटाचे उमेदवार प्रभाकर पाटील आणि तुकाराम म्हात्रे यांच्यात वाद झाला. दोन्ही उमेदवारांमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी पैसे आणि इतर साहित्य ताब्यात घेतले आहे. पंचनामा सुरू असून यात गुन्हा असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली.
उरणमध्ये भाजप उमेदवाराने शाळेत पैसे वाटले
उरण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन ब मधील भाजपचे उमेदवार नंदकुमार लांबे यांनी बोरी येथील मतदान केंद्र असलेल्या शाळेत अनधिकृतपणे कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची बैठक घेतली. या बैठकीत प्रचार पत्रकाबरोबरच पैशांची पाकिटे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. तशी तक्रार उरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. आज दुपारी नंदकुमार लांबे यांची बेकायदा बैठक शाळेत सुरू असल्याची माहिती मिळताच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शाळेत जमा झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. या घटनेचे चित्रीकरण करून लांबे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती उरण निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.




























































