
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत गेल्या महिन्याभरापासून आजारपणामुळे सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय नव्हते. मात्र उपचार सुरू असतानाही ते रुग्णालयातून सोशल मीडियावर सक्रिय होते. आता ते पहिल्यांदा माध्यमांसमोर आले असून सोमवारी सकाळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. वाचा त्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –
– तब्येतील थोडी सुधारणा होत आहे. उपचार फार कठोर असतात. आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. रेडियेशनचा मुख्य भाग संपलेला असून चांगल्या प्रकारे रिकव्हरी सुरू आहे.
– माझ्यासारख्या माणूस स्वस्थ बसू शकत नाही. जर बरा असतो तर नगरपालिका निवडणुकींच्या प्रचारात 100 टक्के महाराष्ट्रात फिरलो असतो.
– नगरपालिका निवडणुका उद्या आहेत आणि शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितले आहे की आज 1 तारखेला लक्ष्मीदर्शन होणार आहे. आता कुठे कुठे लक्ष्मीदर्शन झाले आहे याची माहिती राज्याच्या निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे.
– राज्याच्या मंत्र्याने जाहीर केले होते की लक्ष्मीदर्शन 1 तारखेला सकाळी होणार. त्यामुळे लोक सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी 10 हजार, 15 हजार मतांमागे असे लक्ष्मीदर्शन सुरू आहे.
– ही नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीने सुरू आहे, महाराष्ट्रात आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता. मुळात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवत नव्हते, ते स्थानिक पातळीवर लोक लढत राहिले.
– आता मी पाहिले की नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी सत्तेतील तीन पक्षांनी प्रचारासाठी पाच-सहा हेलिकॉप्टर, खासगी विमाने बूक केली आहेत. हे असे नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत झाले नव्हते.
– एका एका नगरपालिकेसाठी 15-20 कोटींचे बजेट आहे. ही सत्तेतील तीन पक्षातील स्पर्धा आहे. आतापर्यंत आम्ही निवडणुका लढलो, पण या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या. आताही तशाच सोडलेल्या आहेत.
– लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत. नाही विरोधक निवडणुकीत आहेत, पण अशा पद्धतीने निवडणुका कधी लढल्या नाहीत.
– नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कुणाशी स्पर्धा करताय. या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे.
– राज्याला एक संस्कृती होती, संस्कार होता तो गेल्या चार पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सरकारने पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे.
– आपापसात मारामाऱ्या सोडून द्या पण नगरपालिका निवडणुकीत किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादा राहिलेल्या नाहीत. याचे कारण तीन पक्षातील स्पर्धा, तू मोठा की मी मोठा.
– शिंदेसेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे. शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहे. त्यांची जी परंपरा आहे कामाची, त्यांनी आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदेसेनेचा कोथळा दिल्लीतूनच काढला जाईल.
– गेले वर्षभर सांगतो यांचे 35 आमदार फुटणार. ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत गुप्त ऑपरेशन केले आणि आमचे आमदार फोडले, तीच पद्धत, त्याच पद्धतीने आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे.
– रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते कोकणातलेच आहेत. त्यांची नेमणूक डोंबिवलीतून खास त्यासाठीच केलेली आहे. ज्याला राजकारण कळते त्याने ते समजून घेतले पाहिजे.
– रवींद्र चव्हाणांचे 2 तारखेबाबतचे वक्तव्य आहे, मी ही वारंवार तेच सांगत होतो की डिसेंबर नंतर काय होते. यांना वाटत असेल की दिल्लीतील महान नेते आमच्या पाठीशी आहेत, ते कुणाच्याही पाठीशी नसतात.
– हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी, शहा यांना नियमबाह्य मदत केली. कायदा आणि इतर बाबतीत, तरीही त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही, तिथे शिंदे कोण?
– शिंदेंचा पक्ष फुटलेलाच आहे. हा त्यांचा पक्ष नाहीच आहे. तो अमित शहांनी निर्माण केलेला एक गट आहे. हा अमित शहांचा पक्ष आहे, हा शिंदेंचा पक्ष नाही. त्यामुळे माझी शिवसेना खरी आहे हे हास्यास्पद नाही का?
– कसली यांची शिवसेना, यांनी कधी शिवसेनेला जन्म दिला. यांनी शिवसेनेसाठी काय खस्ता खाल्ला, हे कधी शिवसेनेसाठी तुरुंगात केले, यांनी कोणती आंदोलन केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महाराष्ट्रात आजही मजबुतीने उभी आहे.
– पैशाच्या ताकदीवर निवडणुका जिंकणे म्हणजे लोकशाही नाही. याला आम्ही लोकशाही किंवा राज्य करण्याची पद्धत नाही.
– एक मंत्री म्हणतो आमच्याकडे नगरविकास खाते आणि भरपूर पैसे याचा अर्थ निवडणूक आयोग, फडणवीस यांना कळत नाही का? आपण भ्रष्टाचाराच्या झिरो टॉलरन्सची भूमिका घेतो तेव्हा तुमचा एक मंत्री नगरविकास खाते आमच्याकडे आहे तेव्हा आम्हाला पैशाची चिंता नाही असे सांगतो तेव्हा ताबडतोब त्या मंत्र्याला बरखास्त केले पाहिजे आणि नगरविकास खाते त्याच्याकडून काढून घेतले पाहिजे, तर तुम्ही राज्याचे नेतृत्व करता असे आम्ही मानतो.
– आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून नेतृत्व पाहिलेली आहेत. संस्कारी, संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व काय असते शरद पवार, मनोहर जोशींपर्यंत. फडणवीसांकडून अपेक्षा होती पण त्यांना अपयश आलेले आहे.
– फडणवीस यांचे राजकारण जर शिंदेंना कळत नसेल तर त्यांनी राजकारणात राहू नये. नुसते पैशावर राजकारण चालत नाही, पैशावर माणसे विकत घेता येतात.
– मला राज्यातील जनतेचे आश्चर्य वाटते, या राज्याची जनता 10-15 हजारांमध्ये आपल्या मुला बाळांचे भविष्य विकत आहेत. बेरोजगारी, गरिबी तशीच आहे. कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आहे. रोज मुंबईत, महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्याच्यावर कुणी बोलत नाही. त्याच्यावर उतारा 10-15 हजार मताला असेल तर या राज्याच्या जनतेने स्वतला अशा प्रकारे विकल्याने ते आपल्या पुढल्या पिढीचे भविष्य धोक्यात आणत आहेत.
– 10-15 हजार जनतेची किंमत आहे का? पण लुटलेला पैसा, भ्रष्टाचाराचा पैसा अशा माध्यमातून निवडणुकीत येतो आणि जनता खूश आहे. नगरपालिकेला 10 हजार, विधानसभेला 25 हजार आणि लोकसभेला त्याहून जास्त, ही या राज्याच्या जनतेची कमाई आहे. बाकी नोकऱ्या, धंदे काही नाही.
– नारायण राणे भाजपचे खासदार आहेत. भाजपने आमदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला. मी निलेश राणे यांचे अभिनंदन करेन, त्यांनी कोकणात कशा प्रकारे पैशाचे वाटप होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे आमचे मतभेद असतील, पण शेवटी निवडणुकीत पैशाचे वाटप कशाप्रकारे होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला.
– याचा अर्थ शिंदे गटाचे लोक पैसे वाटत नाही का? जास्त वाटत आहेत. पण कोकणातील एका भागात आमदार निलेश राणे यांनी कसे पैसे येतात, पैशाचे वाटप होते यावर प्रकाश पाडला असेल तर निवडणूक आयोगाने त्यांची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे हे काही मला योग्य वाटत नाही.
– निवडणुका पुढे ढकलल्या हे खरे असले तरी, पुढल्या निवडणुकांमध्ये भरपूर वेळ मिळावा त्यासाठी निवडणूक आयोगाशी संगनमत करून केलेली ही राजकीय व्यवस्था आहे.
– शिंदे न्यूयॉर्कलाही जिंकू शकतात. त्यांच्याकडे जे कोट्यवधी रुपये आहेत ते डॉलरमध्ये कन्व्हर्ट करतील आणि तिथे वाटायला जातील. ते जर्मनीमध्ये जिंकू शकतात. ते कुठेही जिंकू शकतात. त्यांना असे वाटते माझ्या हातात लुटीचा प्रचंड पैसा असल्यामुळे जग माझ्या मुठीत आहे. राजकारण हे मुठीतील वाळूसारखे असते, ते कधीही सटकू शकते.
– मी तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून सांगतोय, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. जागावाटपावर बैठका सुरू आहेत आणि योग्य दिशेने ही चर्चा सुरू आहे.
– उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे. एकमेकांना भेटत आहेत, चार दिवसांपूर्वीही भेट झाली. या भेटीत राज ठाकरे यांनी महानगरपालिकेसंदर्भात एक प्रेझेंटेशन तयार केले होते, ते दाखवले. ते उत्तम प्रेझेंटेशन आहे हे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले. त्याच्यामुळे कुणाला चिंता करण्याचे कारण नाही.
– हे शिंदे, मिंधे काय म्हणतात, त्यांना सांगा संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला मुंबईसाठी तेव्हाही तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी प्रचंड पैसा टाकला, पण मराठी माणूस एकजुटीने उभा राहिला आणि मुंबई महाराष्ट्रात राहिली.
– ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान तुमचे दिल्लीतील बापजादे करताहेत मिस्टर शिंदे. शहा, मोदी आणि अदानी हे त्रिकूट महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा जो प्रयत्न करतोय तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकजूट हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.
– काँग्रेसशी आमची चर्चा सुरू आहे. त्यांना जर वाटत असेल बिहारच्या निवडणुकीनंतर कॉन्फिडन्स वाढला असेल तर ते मुंबईमध्ये स्वतंत्र लढायला तयार आहे, तर त्यांना लढू द्या. आमची, त्यांची चर्चा सुरू आहे.
– मी साधारण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीत जाणार आहे. तेव्हा माझा प्रयत्न असेल या विषयावर त्यांच्या हायकमांडशी बोलेल. पण काँग्रेसने महाविकास आघाडी म्हणून मुंबईत सोबत असणे ही आमची भूमिका आहे. काँग्रेस पक्ष आम्ही एकत्र आहोत.
– राज ठाकरे सोबत आल्याने भाजपाचा पराभव होणार आहे. आमचा जो शत्रू आहे, मुंबईचा जो शत्रू आहे तो भाजप आहे. गौतम अदानीला ज्या पद्धतीने मुंबई घशात घातली जात आहे ती जर थांबवायचे असेल तर राज ठाकरे यांचे सोबत असणे ही मुंबई आणि महाराष्ट्राची गरज आहे.
– प्रयागराजला जाऊन बघा तिथे जे काम झाले ते सगळे कॉन्ट्रॅक्टर गुजरातचे होते. स्थानिक लोकांना काम मिळायला हवे. नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे, पण तिथे गुजरातच्या ठेकेदारांनी डेरा टाकला आहे. नाशिकमध्ये कामहोत असेल तर महाराष्ट्रातील ठेकेदारांना काम मिळाले पाहिजे.
– साधुग्रामसाठी 2 हजार झाडं तोडणार आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवला जात आहे. लोकांना बेघर, बेरोजगार केले जात आहे हे कुंभमेळ्याचे काम आहे का?
– 25 हजार कोटींचे बजेट पूर्ण गुजरातमध्ये जात आहेत. गिरीश महाजनांना विचारा मी खोटे बोलत असेल तर. मी पूर्ण ठेकेदारांची यादी द्यायला तयार आहे.
– एसआयआरवर संसदेत आम्ही चर्चेची मागणी केली आहे. याबाबत नोटीस देण्यात आली आहे. एसआयआरवर चर्चा व्हायला हवी, पहलगाम, दिल्ली बॉम्बस्फोटावरही चर्चा व्हायला हवी. ही सरकारची जबाबदारी आहे की देशातील प्रमुख प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी. पण सरकार पळ काढत असून सरकार घाबरत आहे.
– बिहारमध्ये एवढा मोठा विजय झाल्यानंतरही सरकार विरोधकांना घाबरत असून चर्चेपासून पळ काढत आहे. सरकार संसदेचे कामकाज चालू देणार नाही.

























































