
पुणे जिल्ह्यात अलीकडील अतिवृष्टीमुळे सीना नदीवरील अनेक बंधारे फुटून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे नियोजनाअभावी अडकली असल्याचा आरोप केला आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यांचे गेट खराब झाले, भराव वाहून गेला आणि संपूर्ण रचना कोसळल्यामुळे परिसरातील शेती आणि पाणीपुरवठा व्यवस्था धोक्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पालकमंत्री तसेच जलसंपदामंत्री यांच्या विभागाशी पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष कामाचा गतीमान निकाल दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले.
रोहित पवार म्हणाले की, निमगाव डाकू आणि चोंडी येथील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु असूनही ते अर्धवट सोडण्यात आले आहे आणि संबंधित यंत्रणा जलसंपदा विभागाने स्थलांतरित केली आहे. तर जवळा येथील बंधाऱ्याचे काम अधूनमधून चालते, निमगाव गांगर्डा येथे काम अद्याप सुरूच नाही आणि मलठण–कवडगाव तसेच दिघी परिसरातील कामाची गती “कासवाच्या वेगाने” आहे, अशी टीका त्यांनी केली.
या संदर्भात पवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, सरकार माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेत आहे काय? तसेच उन्हाळ्यात पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहील आणि शेतकऱ्यांना स्वतंत्र नुकसानभरपाई द्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.




























































