
पुण्यातील भाजप आणि अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीमध्ये गडबड घोटाळा सुद्धा सुरू आहे. दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांमध्ये मारामारी सुरू आहे. आता बुथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा उद्योग सुरू आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. सत्ताधाऱ्यांचा सत्ता पिपासूपणा हा जनतेच्या हिताचा नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
निवडणुकांचा सिजन सुरू आहे. निवडणुकीमध्ये गडबड घोटाळा सुद्धा सुरू आहे. आणि यावेळी पहिल्या प्रथम आपण ज्या निवडणुका अनुभवतो आहोत, तो अनुभव फार वाईट आहे. नगरपरिषदा, नगरपंचायत, जिल्हा परिषद, महापालिका या सगळ्या निवडणुका ३१ जानेवारीच्या आत घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पण अजूनही मुंबई आणि इतर शहरातल्या मतदारयाद्यांमध्ये जो प्रचंड घोळ आहे, त्या घोळाबाबत कोणीच बोलत नाही. त्याच्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून लक्ष द्यायला पाहिजे. जसं भटक्या कुत्र्यांचा असेल, इतर विषयांच्या बाबतीत असेल सर्वोच्च न्यायालय स्वतःहून लक्ष घालतं तसं हा लोकशाहीचा विषय आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे की, या मतदारयादींमधला जो घोळ आहे, त्या घोळाबाबत आपण काय करता आहात? आणि तो घोळ जोपर्यंत निस्तरत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांमध्ये जी काय मारामारी सुरू आहे, म्हणजे आतापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये असे प्रकार होतात हे ऐकत होतो. बंदुका निघत होत्या, हणामाऱ्या होत होत्या, आता बुथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा उद्योग सुरू आहे. हा जो काही कारभार चाललेला आहे म्हणजे सत्ता पिपासूपणा हा जनतेच्या हिताचा नाही. स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची घरं भरायची या दिशेने वाटचाल सुरू आहे. अशा वेळेला आपण सगळे सुजाण नागरिक आता शिवसेनेकडे येत आहेत. कारण जनतेला आता शिवसेना हा एकमेव प्रकाश दिसतोय जिच्या हातामध्ये मशाल आहे. तुमचं सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“…तर मग उपमुख्यमंत्रीपद हे तात्काळ रद्द करा”
दोन गोष्टी आहेत एक विरोधी पक्षनेतेपद आणि दुसरं उपमुख्यमंत्रीपद. कारण विरोधी पक्षनेतेपद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे. त्याबद्दल आम्ही पहिल्याच अधिवेशनात मागणी केली होती. एक वर्ष होऊन गेलं. एका वर्षात सरकारने जाहिरातींशिवाय काहीही केलं नाही. या एका वर्षामध्ये दोन्ही सभागृहामध्ये कदाचित आपल्या विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्या प्रथम असा काळ आला असेल की दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीत. एकतर विरोधी पक्षनेतेपदाला हे सरकार का घाबरतंय? एवढं हे मजबूत सरकार आहे. ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे. अनेक भ्रष्टाचारी सुद्धा त्यांच्यात घेतलेत. त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातली आहेत. एवढं पांघरुणं घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षनेत्याला हे सरकार का घाबरतंय? तर ताबडतोब त्यांनी दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद जाहीर केली पाहिजेत. आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्रीपद हे तात्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानात कुठेही तरतूद नाही. कायद्यानुसार एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेते दोन्ही सभागृहात या सरकारने येत्या अधिवेशनात जाहीर केलीच पाहिजेत ही आमची आग्रही मागणी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“केंद्रीय कृषीमंत्र्यांचे धन्यवाद, त्यांनी या सरकारचे सोंग आणि ढोंग उघडं पाडलं”
केंद्रीय कृषीमंत्र्यांचे धन्यवाद, कारण त्यांनी यांचे सोंग आणि ढोंग उघडं पाडलेलं आहे. त्यांचेच दात त्यांनी घशात घातलेत. साधारणतः सप्टेंबरपासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं संकट हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्याच्यानंतर आपत्ती म्हणून ती जाहीर करायला पाहिजे होती. ओला दुष्काळ ही संज्ञा नाही म्हणून तुम्ही ते संकट टाळू शकत नाही. त्या संकटाच्या दृष्टीने त्यांनी जे काही आतापर्यंतच्या इतिहासातील पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेजचाही पत्ता नाही. आता या शेतकऱ्याला कर्जमुक्त करतायला पाहिजे. कर्जमुक्त करू हे त्यांनी निवडणुकीच्या आधी जाहीर केलं होतं. आणि जिंकूण आल्यानंतर अर्थमंत्री म्हणाले की जिंकण्यासाठी हे बोलावं लागतं. हे एवढं खोटं बोलणारं सरकार आहे की ज्यांनी केंद्राला प्रस्तावच पाठवला नव्हता. आणि प्रस्ताव पाठवला नाही हे जाहीर झाल्यानंतर लोकांना कळल्यानंतर घाईघाईने गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रस्ताव पाठवला. आता तो प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच गेलेला आहे. त्याच्यावरती अभ्यास कधी होणार? केंद्राची कमिटी कधी येणार? मग त्या तिजोरीची चावी कोणाकडे आहे? त्या तिजोरीतून राज्याच्या तिजोरीत पैसा कसा येणार? आणि त्या राज्याच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा कधी जाणार? याच्याबद्दल काहीच मुख्यमंत्री बोलत नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

























































