
महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवल्याने राज्यातील तरुण संकटात आले आहेत. त्यातच आता कोकणातील हापूस आंबा गुजरातला पळविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने हापूसवर दावा करत वलसाड हापूसच्या भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल केला आहे. यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे.
कोकणपट्टय़ातील हापूस आंब्याला जागतिक ओळख मिळाली असून गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा म्हणून तो प्रसिद्ध आहे. याची गोडी भारतीयांनाच नाही तर अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंतच्या लोकांना लागली आहे. अशा या हापूस आंब्याला पहिले आणि एकमेव भौगोलिक मानांकन मिळाले आहे. पण आता ‘वलसाड हापूस’ भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल करत गुजरातने थेट आव्हान दिले आहे. ज्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली असून चिंतेत भर पडली आहे.
गुजरातचा ‘वलसाड हापूस’साठी अर्ज
गुजरातमधील गांधीनगर व नवसारी कृषी विद्यापीठाच्या पुढाकारातून 2023 मध्ये ‘वलसाड हापूस’ या नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जाची प्राथमिक सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी पार पडली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. गुजरातच्या या दाव्यामुळे एकाच आंबा जातीसाठी वेगवेगळी मानांकनं मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी भीती कोकणातील उत्पादक व्यक्त करत आहेत.
कोकणातील आंबा उत्पादकांचा ‘वलसाड हापूस’ला विरोध
‘कोकण हापूस’ हे नाव कोणत्याही एका राज्यासाठी नसून विशिष्ट भौगोलिक, हवामान आणि मातीच्या परिस्थितीत पिकलेल्या आंब्यासाठी राखीव आहे. कोकणातील चार जिल्ह्यांतील वैशिष्टय़पूर्ण परिस्थितीमुळेच या आंब्याची चव, रंग आणि टिकाऊपणा वेगळा ठरतो, असे स्पष्ट करत कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेता संघटनेचे डॉ. विवेक भिडे यांनी वलसाड हापूस मानांकनाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
भविष्यात ‘कर्नाटक हापूस’चा धोका
कोकणातील चार जिल्ह्यांतील वैशिष्टय़पूर्ण परिस्थितीमुळेच या आंब्याची चव, रंग आणि टिकाऊपणा वेगळा ठरत आहे. मात्र आता गुजरातने दावा करत मानांकन मिळवले तर याचा थेट परिणाम कोकणातील हजारो आंबा उत्पादकांच्या उत्पन्नावर होईल. भविष्यात ‘कर्नाटक हापूस’साठीही असाच प्रयत्न होऊन धोका वाढू शकतो, अशी भीती कोकणातील आंबा उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे.
‘कोकण हापूस’ हा जगातील पहिला आणि एकमेव हापूस आंबा आहे, ज्याला स्वतंत्र भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. 2018 साली मिळालेल्या या जीआय टॅगमुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि परिसरातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात वेगळी ओळख, चांगला दर आणि संरक्षण मिळाले. या मानांकनामुळे कोकण हापूसची निर्यात अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये वाढली आहे.




























































