
शहरातील प्रारूप मतदारयादीमध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ असून, याला सत्ताधारी व प्रशासन जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले. देशामध्ये कुठेच घडले नसेल, असे अहिल्यानगरातील मतदारयादीत घडले असून, हिंदू-मुस्लिम एकाच घरामध्ये राहतात, असे यादीमधून दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या सर्वाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हेसुद्धा जबाबदार नाहीत का? असा सवाल करत दुबार नावे तातडीने वगळण्याची मागणी कळमकर यांनी केली.
अहिल्यानगर मनपाची निवडणूक येऊ घातली आहे. या संदर्भात आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी प्रारूप मतदारयाद्यांची चिरफाड केली. त्यांनी पुराव्यासहित अनेक मुद्दे उपस्थित करत सत्ताधारी पक्षाला फायदा होईल याच पद्धतीने रचना केली आहे. प्रभाग क्रमांक 10, 11, 12 येथील नावे दुसऱया प्रभागांमध्ये टाकण्यात आली आहेत. विशेष म्हणजे महानगरपालिकेने 9500 दुबार नावे असल्याचे सांगितले आहे; पण आमच्या मते अजूनही पाचशे ते सातशे नावे दुबार आहेत, असे कळमकर यांनी सांगितले.
मतदारयाद्या तयार करण्याचे काम भाजपाच्या एका पदाधिकाऱयाला कसे देण्यात आले आहे, याबाबत सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे उघड केले होते. मात्र, यावर भाजपचा पदाधिकाऱयांनी आजपर्यंत उत्तर दिलेले नाही. म्हणजेच सत्ताधाऱयांना फायदा होईल याची पुरेपूर काळजी मतदारयाद्या बनविताना सत्ताधिकारी व प्रशासन यांनी घेतल्याचा आरोप कळमकर यांनी केला. एकंदरीतच हा सर्व प्रकार सर्वसामान्य माणसांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार आहे. लोकशाहीला काळीमा फासण्याचा कुटील डाव सत्ताधाऱयांनी आखल्याचा आरोप कळमकर यांनी केला आहे.
मतदारयादीत असे आहेत घोळ
n पुरुषाला महिला केले, महिलेला पुरुष केले किंवा 60 वर्षांच्या माणसाचे वय 25 वर्षे दाखविले, एवढेच नाही तर काही ठिकाणी फोटो बदलून आडनाव टाकले गेले नाही. असे प्रकार यादीमध्ये घडले असून, ही बाब गंभीर आहे. एकप्रकारे हा जनतेवर अन्याय आहे, असेही अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे.
श्रीगोंद्यातील नावे यादीत कशी?
n श्रीगोंदा, राहुरी व पारनेर तालुक्यातील नावे अहिल्यानगर मनपाच्या यादीत आली आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गटातील नावे 4000 नावे यामध्ये आहेत. याची प्रशासनाला माहिती देऊन हरकत घेतली आहे. याबाबत अद्यापि गुन्हा का दाखल झाला नाही. याला जबाबदार असणाऱयांवर तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी कळमकर यांनी केली.
हिंदू-मुस्लिम एकाच घरात राहतात
n देशात कोठेच घडले नसेल ते अहिल्यानगर मनपाच्या मतदारयादीमध्ये पाहायला मिळत आहे. यादीमध्ये पत्ता नावे दिली गेली आहेत. त्यामध्ये हिंदू-मुस्लिम हे एकाच घरामध्ये राहतात व त्यांची नावे, पत्ते काय आहेत हे कळमकर यांनी उदाहरणासहित दाखवून दिले.





























































